अजितदादा की शरद पवार? आशुतोष काळेंचं ठरलं! थेट अमेरिकेतून केला निर्णय जाहीर
Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाची ताकद सातत्याने वाढत चालली आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत अजितदादांच्या गटात जाण्यासाठी आमदारांची स्पर्धा लागली आहे. आता शरद पवार गटासाठी धक्का देणारी बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातून आली आहे. कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) सुद्धा अखेर अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
आमदार काळे यांनी थेट परदेशात अॅफेडेव्हीट पाठवत अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. त्यांची ही खेळी पक्ष सावरण्यासाठी निघालेल्या शरद पवार यांच्यासाठी धक्का देणारी मानली जात आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार काळे यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी अजितदादांची भेट का घेतली याची फारशी माहिती त्यावेळी समोर आली नव्हती. आता मात्र, घुले पवार भेटीचे कनेक्शनही आमदार काळे यांच्या पाठिंब्याला जोडले जात आहे.
लहामटेंची दोनच दिवसात पलटी; शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात…
राष्ट्रवादीमधील बंडानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात आमदारांची मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. यातच नगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके, संग्राम जगताप यांनी अजित पवार यांच्या गटाला साथ दिली आहे. लहामटे हेही सुरुवातीला अजित पवारांसोबत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यांनी अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थिती लावली होती. मात्र शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्याबरोबर आहे, असं म्हणतं त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. नंतर आता मात्र तेही अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
आमदार लहामटे अजित पवार सहभागी होत नाहीत तोच आमदार काळे यांच्याही पाठिंब्याची बातमी येऊन धडकली. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, नीलेश लंके यांनी आधीच अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला होता. आशुतोष काळे अमेरिकेत असल्याने त्यांचा भूमिका काय हे मात्र स्पष्ट होत नव्हते. अशा परिस्थितीत आ. काळे कुणाबरोबर असतील याबाबत तर्क लढविण्यात येत होते. कोपरगाव मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांना निर्णय घेणेही कठीण असल्याचे मानले जात होते.
वर्ध्यात शरद पवार गटाला खिंडार! माजी केंद्रीय मंत्र्याने धरला अजित पवारांचा हात…
मात्र, स्थानिक राजकारण पाहता आता त्यांनी अजित पवार यांनाच साथ देण्याचे निश्चित केले. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर निर्माण झालेल्या दोन गटांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आमदार देखील विभागले गेले होते. यामध्ये निलेश लंके, संग्राम जगताप यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. तर रोहित पवार, प्राजक्त तनपुरे हे शरद पवार गटात सामील झाले होते. दरम्यान त्यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरणात चांगलेच ढवळून निघाले आहे.