मंत्रिमंडळ विस्तारात नगरकरांच्या पदरी निराशा! जिल्ह्यात फक्त विखेच एकमेव मंत्री

मंत्रिमंडळ विस्तारात नगरकरांच्या पदरी निराशा! जिल्ह्यात फक्त विखेच एकमेव मंत्री

Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले व नुकतेच युतीमधील अनेक नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ देखील पडली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात नगर जिल्ह्याच्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे. कारण सबंध जिल्ह्यात केवळ एकच मंत्रिपद मिळाले आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी जिल्ह्यात अनेक इच्छुकांची नावे समोर आली होती. मात्र आता या सगळ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. याआधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तीन मंत्रिपद एकट्या नगर जिल्ह्यात होती.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथे महायुतीच्या जवळपास 39 मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यंदाचा शपथविधी सोहळा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. यामध्ये एक प्रमुख कारण म्हणजे तिन्ही पक्षामध्ये दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काही ज्येष्ठ नेत्यांना धक्का देण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही ज्येष्ठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला असून 39 पैकी 20 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

नगरविकास, पर्यटन अन् आरोग्य.. शिवसेनेला मिळणार वजनदार खाती; यादीच आली समोर

जिल्ह्यात फक्त विखेच

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलायचे झाले तर नगर जिल्ह्यातून सलग सातव्यांदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बारा विधानसभा मतदारसंघ असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये महायुतीने मोठे यश संपादन केले. बारा पैकी दहा जागांवर महायुतीचे उमेदवार हे निवडून आले यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक अपेक्षा होत्या. जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, शेवगाव-पाथर्डीचे भाजपचे आमदार मोनिका राजळे, कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्यासह राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डीले यांचे देखील नाव चर्चेत होते. जिल्ह्यात महायुतीला मिळालेलं घवघवीत यश पाहता जिल्ह्यात एकापेक्षा जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु फक्त राधाकृष्ण विखे पाटील यांनाच ही संधी मिळाली व एकच मंत्रिपदावर जिल्ह्याला समाधान मानावे लागले.

मंत्रिपद! आघाडीच्या काळात तुपाशी तर युतीच्या काळात उपाशी

नगर जिल्ह्यात 2019 ला ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा नगर जिल्ह्याकडे तीन मंत्रिपदे होती. यामध्ये महसूलमंत्री पदासह एक कॅबिनेट तर एक राज्यमंत्री पद नगर जिल्ह्याला मिळाले होते. 2019 ला आघाडी सरकारमध्ये जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री होते तर शिवसेनेकडून (उबाठा) शंकरराव गडाख यांच्याकडे मृद व जलसंधारण खाते देण्यात आले होते. राज्यमंत्रीपदी प्राजक्त तनपुरे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ महायुतीकडून विखे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकली आहे. विशेष म्हणजे क्षेत्रफळाच्या मानाने व राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख आहे.

Video : हो, मी नाराज; मला डावललं काय अन् फेकलं काय? भुजबळांच्या मनातलं अखेर बाहेर आलचं

सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या कालावधीत नगर जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री पदे मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसचे गोविंदराव आदिक तसेच राष्ट्रवादीचे मधुकर पिचड हे कॅबिनेट मंत्री होते. तर बाळासाहेब थोरात पाटबंधारे राज्यमंत्री होते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीच्या सरकारच्या काळात राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे कॅबिनेट मंत्री होते. तर सध्या भाजपात असलेले व पूर्वीचे राष्ट्रवादीचे बबनराव पाचपुते पालकमंत्री होते. 2014 मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले होते. त्यावेळी जलसंधारण व पालकमंत्री पद भाजपचे आमदार राम शिदे यांच्याकडे होते.

जिल्ह्याचा दक्षिण भाग मंत्रिपदापासून वंचित

क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्हा उत्तर आणि दक्षिण असा विभागलेला आहे. यामध्ये पहिले तर उत्तरेकडील तालुके हे सधन आहे तर दक्षिण भाग हा दुष्काळी पट्टा समजला जातो. यामुळे आता नगर जिल्ह्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरून जिल्ह्यात दक्षिण उत्तर वाद पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या दक्षिण भागातून एकही मंत्रिपद न मिळाल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजीचा सूर उमटताना दिसतो आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube