Dhule Loksabha : कोणता टर्निंग पॉईंट सुभाष भामरे यांना हैराण करणार?

Dhule Loksabha : कोणता टर्निंग पॉईंट सुभाष भामरे यांना हैराण करणार?

Dhule Lok Sabha Election 2024 : उत्तर महाराष्ट्रातील धुळे मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा (Dhule Lok Sabha Election 2024) बालेकिल्ला. पण मागील तीन निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा हा गड हिसकावून घेतला. येथे आता भाजपाचा खासदार आहे. मतदारसंघातील मतांचं गणित डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने पुन्हा खासदार सुभाष भामरेंना तिकीट दिलं. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा घोळ सुरू असताना उमेदवारी जाहीर करून भाजपने बाजी मारली. भामरेंना प्रचारासाठी पुरेसा वेळही मिळाला. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार रिंगणात असल्याने मतांचं विभाजन भाजपाच्या पथ्यावर पडेल असा कयास होता.

परंतु, अर्ज छाननीत वंचितचे उमेदवार अब्दूर रहमान यांचा अर्ज बाद झाला अन् धुळ्यातील सामन्याचा हाच टर्निंग पॉइंट ठरेल असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. एमआयएमनेही या मतदारसंघात काँग्रेसला पाठिंबा दिल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यात सरळ लढत आहे. मतदारसंघातील मतदानही झालं आहे तेव्हा आता कोण बाजी मारणार, काँग्रेस पुन्हा आपला गड ताब्यात घेणार की भामरे विजयाची हॅटट्रीक साधणार याचं उत्तर चार जूनला मिळणार आहे.

प्रचारात भामरेंची आघाडी, ‘मविआ’चाही मास्टरस्ट्रोक

धुळे मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला तो येथील राजकीय घडामोडींमुळे. भाजपने विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनाच तिकीट दिलं. भामरेंच्या विरोधात कुणाला तिकीट द्यायचं असा प्रश्न महाविकास आघाडीसमोर होता. जागावाटपात धुळे काँग्रेसच्या वाट्याला आलं होतं. परंतु, उमेदवारी देताना काँग्रेसची दमछाक झाली. सुरुवातीला आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील, समाजसेविका प्रतिभा शिंदे यांची नावे चर्चेत होती. परंतु, काँग्रेसने मात्र माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. बच्छाव यांच्या नावाला विरोध होत होता मात्र हा विरोध शांत करण्यात भाजपला यश मिळालं.

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?

वंचित, एमआयएमच्या टर्निंग पॉइंटनं निवडणूक फिरली?

काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार दिल्याने भाजपसाठी निवडणूक सोपी राहिली नाही. भाजपने तगडा उमेदवार दिला असला तरी मतदारसंघातील घडामोडी विपरीत घडल्या. सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी अब्दूर रहमान यांना तिकीट दिले होतं. मात्र अर्ज छाननीत त्यांचा अर्ज बाद झाला. महाविकास आघाडीसाठी हा मोठा प्लस पॉइंट ठरला. निवडणुकीच्या रिंगणात वंचितचा उमेदवार नसल्याने मतविभाजन टळलं.

महाविकास आघाडीला दुसरा सुखद धक्का दिला तो एमआयएमनं. या मतदारसंघातील दलित आणि मुस्लीम मतदारांची निर्णायक संख्या पाहता एमआयएमचा उमेदवार असेल असे वाटत होते. परंतु, एमआयएमने काँग्रेसला पाठिंबा दिला. या दोन टर्निंग पॉइंटने भामरेंच्या हॅटट्रीकचं गणित अवघड करून टाकलं. निवडणुकीत महायुती एकसंघ दिसत असली तरी महाविकास आघाडीच्या बाजूने घडलेल्या घडामोडींनी मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक बनली.

मतदारसंघातील कळीचे मुद्दे

मुंबई दिल्ली इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला चालना मिळाली नाही. मनमाड-इंदोर रेल्वे मार्गाचे भिजत घोंगडे कायम आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार ज्याद्वारे उपलब्ध होऊ शकतो तो टेक्सटाइल पार्कही रखडला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर या भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो.

सन 2019 मधील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसकडून कुणाल पाटील रिंगणात होते. तर आमदार अनिल गोटे अपक्ष उमेदवार होते. या निवडणुकीची सूत्रे भाजपने गिरीश महाजन यांच्या हातात दिली होती त्यामुळे गोटे नाराज झाले होते. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली होती. परंतु तरीही विजय खेचून आणण्यात भामरे यशस्वी ठरले होते. या निवडणुकीत एकूण 19,04,859 इतकं मतदान झालं होतं. यामध्ये धुळे ग्रामीण 2,28,112, धुळे शहर 1,54,975, शिंदखेडा 1,86,289, मालेगाव मध्य 1,43,295, मालेगाव बाह्य 1,90,033 आणि बागलाणमध्ये 1,77,044 इतकं मतदान झालं होतं.

‘लीड’ एक लाखांच्या आत; 169 मतदारसंघात वाढली सत्ताधारी-विरोधकांची ‘धाकधूक’

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने अमरीश पटेल यांना मैदानात उतरवल होतं. या निवडणुकीत एकूण 58.68 टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत एकूण 16,43,720 इतकं मतदान झालं होतं. यामध्ये धुळे ग्रामीण 3,32,378, धुळे शहर 2,35,709, शिंदखेडा 2,94,617, मालेगाव मध्य 2,32,103, मालेगाव बाह्य 2,42,409, बागलाण 2,36,514 असे मतदान झालं होतं.

असा ढासळत गेला काँग्रेसचा गड..

धुळे मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आतापर्यंत येथून सोळा खासदार झाले आहेत. 1957 ते 1962 या दुसऱ्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत जनसंघाच उत्तमराव पाटील विजयी झाले होते. 1962 ते 1977 पर्यंत काँग्रेसचे चुडामन पाटील खासदार राहिले. 1977 ते 1980 या काळात काँग्रेसचेच विजय नवल पाटील विजयी झाले होते. सातव्या लोकसभा निवडणुकीपासून नवव्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसच्या रेशमा मोतीराम भोये खासदार राहिल्या. 1991 ते 1996 या काळात काँग्रेसचे बापू हरि चौरे विजयी झाले.

1996 ते 1998 या काळात मात्र भाजपने बाजी मारली. साहेबराव बागुल यांनी विजय खेचून आणला. पण पुढे काँग्रेसने पुन्हा या मतदारसंघावर कब्जा मिळवला. त्यावेळी धनाजी सिताराम अहिरे विजयी झाले होते. यानंतर 1999 ते 2004 या तेराव्या लोकसभेच्या काळात भारतीय जनता पार्टीचे रामदास गावित यांनी बाजी मारली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा उलटफेर पाहण्यास मिळाला. काँग्रेसच्या बापू हरि चौरेंनी धुळ्याचा गड काबीज केला. त्यानंतर 2009 मध्ये पंधराव्या लोकसभेसाठी निवडणुका झाल्या. यावेळी मात्र भाजपने बाजी मारली. प्रतापराव सोनवणे खासदार झाले.

2014 मधील सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना तिकीट दिले. भामरेंनीही विजयी पताका फडकावली. पुढे 2019 मधील निवडणुकीतही दणदणीत विजय मिळवत भामरे खासदार झाले. आता 2024 मधील निवडणुकीत भामरे पुन्हा खासदार होतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पाच निवडणुकीतील विजयी उमेदवारांची मते

2019- सुभाष भामरे विजयी 56.54 टक्के मते
2014- सुभाष भामरे विजयी 58.86 टक्के मते
2009- प्रताप सोनवणे भाजप विजयी 39.03 टक्के मते
2004- बापू चौरे, काँग्रेस विजयी 46.25 टक्के मते
1999- रामदास गावित भाजप विजयी 36.14 टक्के मते

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज