शिर्डी लोकसभा : सामना लोखंडे विरुद्ध वाकचौरेंचा…मात्र कसोटी विखे-थोरातांची

शिर्डी लोकसभा : सामना लोखंडे विरुद्ध वाकचौरेंचा…मात्र कसोटी विखे-थोरातांची

Shirdi Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवारांबरोबरच वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात शिर्डी लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. कारण राज्याच्या राजकारणातील दोन ज्येष्ठ नेते यामध्ये माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तर दुसरीकडे मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे व महायुतीचे सदाशिव लोखंडे हे जरी उमेदवार असले तरी खरा सामना राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात असाच आहे.

राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या या दोन्ही नेत्यांची धावपळ आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठीची आहे. यातच यंदाच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या उमेदवाराची धमाकेदार एंट्रीने निकालाची गणित बिघडणार का? फटका कोणाला बसणार ? आजी माजी दोन्ही नेत्यांच्या या सामन्यात कोण जिंकणार हे मात्र येत्या चार जून रोजी स्पष्ट होईल. तत्पूर्वी मतदारसंघात काय परिस्थती होती व कुणाचे प्राबल्य किती ते आपण जाणून घेऊ…

Sharad Pawar : खात्री असायला हरकत नाही; पवारांच्या विधानाने बारामतीत ट्विस्ट

साईंची पुण्यभूमी मानली जाणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने नेहमीच चर्चेत असतो. याला कारणही तशीच आहेत. प्रामुख्याने आपण या मतदारसंघाचा विचार केला तर आरक्षित असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोणत्याही पक्षाचे कोणतेही उमेदवार असले तरी खरी लढत ही अप्रत्यक्षपणे रंगते ती राधाकृष्ण विखे विरुद्ध बाळासाहेब थोरात या दोन पारंपरिक विरोधकांत.

मात्र शिर्डी या मतदारसंघाचे आरक्षण यंदाच्या निवडणुकीपुरतेच मर्यादित आहे. पुढच्या पंचवार्षिकला हा मतदारसंघ खुला होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचितने देखील जोर लावला आहे. मतदारसंघातील नाराजीचा फटका कोणाला, किती बसणार तसेच निवडणुकीत कोण कुणाला मदत करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मातब्बर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ

पूर्वीचा कोपरगाव आणि आत्ताच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला असता गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर काँग्रेसचं वर्चस्व राहिल्याचं दिसतं. 2009 मध्ये मतदारसंघ फेररचनेत शिर्डी हा लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. या मतदारसंघात अनेक मातब्बर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. यात प्रामुख्याने राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे आणि मधुकरराव पिचड या नेत्यांच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. राजकीय ताकदीचा विचारात केला तर महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत.

भाजपाच्या पॉकेटमध्ये कमी मतदान; संकटमोचकांचा ‘मूड’ बदलला, थेट अहवालच मागवला

मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात

शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. एकेकाळी राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे दोघेही काँग्रेसमध्येच होते. थोरात आजही काँग्रेसमध्ये आहेत. मात्र विखे 2019 मध्ये भाजपात आले व शिर्डीतून त्यांनी सदाशिव लोखंडे यांना पाठबळ देत निवडून आणले. तसेच यंदाच्या 2024 मध्ये देखील लोखंडेंच्या विजयाची धुरा विखेंच्या खांद्यावर आहे मात्र नगर दक्षिणेतून विखे यांचे सुपुत्र सुजय विखे हे स्वतः देखील निवडणुकीच्या मैदानात असल्याने विखेंचे संपूर्ण लक्ष नगर दक्षिणेच्या निवडणुकीवर होते. याचाच फायदा घेत थोरात यांनी शिर्डीमध्ये यंदा जास्त जोर लावला होता. विखेंना धक्का देत वाकचौरेंना निवडून आण्यासाठी थोरातांची कंबर कसल्याचे देखील दिसून आले.

यंदाच्या निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव फारसा जाणवत नसल्याचे दिसते. सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब वाकचौरे या दोघांकडे संस्थात्मक ताकद आणि स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे लोखंडे यांना अप्रत्यक्षपणे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर तर वाकचौरे यांना काँग्रेसचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अवलंबून राहावे लागले. त्यामुळे मतदारसंघातील लढत थेटपणे विखे विरुद्ध थोरात अशीच रंगली. मात्र यंदाच्या निवडणुकीत लोखंडेंवर असलेली मतदार संघातील नाराजी व विखेंचे शिर्डीवरील पकड काहीशी ढिली झाल्याचा फटका महायुतीला बसला तर या मतदार संघात पुन्हा एकदा थोरातांचे प्राबल्य दिसून येईल.

मतविभागणीचा फटका कोणाला बसणार

शिर्डीमध्ये शिवसेनेच्या दोन गटांबरोबरच वंचितच्या एन्ट्रीने तिरंगी लढत झाली. गेली अनेक वर्षे काँग्रेससोबत असलेल्या उत्कर्षा रुपवते या शिर्डीमधून उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. मात्र उमेदवारी डावलली गेल्याने अखेर वंचितकडून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. यामुळे निर्माण झालेल्या या तिरंगी लढतीने मतांचे विभाजन निश्चित मानले जात आहे. रुपवते या काँग्रेसमधून बाहेर पडल्याने वाकचौरे यांना मिळणारे मतांचे विभाजन होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मतदारसंघातील नाराज मतदार कु्णाला कौल देतात, त्याचा फटका कुणाला बसणार याची उत्तरं, निकालाच्या माध्यमातूनच स्पष्ट होतील. मात्र तत्पूर्वी वंचितच्या उमेदवारामुळे मतविभागणी झाली व याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसला तर ही मोठी नामुष्की थोरातांवर असणार आहे. जर असले घडले तर या मतदारसंघात विखेंचे प्राबल्य पुन्हा एकदा अधोरेखित होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube