भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवून घेणारे आरक्षणावर गप्प का? मंत्री विखेंचा थोरातांवर थेट निशाणा

Radhakrishna Vikhe Criticize Balasaheb Thorat

Minister Radhakrishna Vikhe Criticize Balasaheb Thorat : भावी मुख्‍यमंत्री म्‍हणून मिरवून घेणाऱ्यांनी मराठा समाजाच्‍या आरक्षणावर शब्‍दही कधी काढला नाही. अडीच वर्षांची सत्‍ता भोगताना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले 16 टक्‍के आरक्षण घालविण्‍याचे महापापही केले. त्‍यांनी महायुती सरकारने काढलेल्‍या शासन आदेशावर बोलण्‍यापेक्षा आत्‍मपरिक्षण करावे, असा सल्‍ला जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना दिला आहे.

मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात

मंत्री विखे पाटील पुढे बोलताना म्हणाले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी शासन आदेशावर केलेले वक्‍तव्‍य अत्‍यंत दुर्दैवी आहे. गेली अनेक वर्ष तेही सत्‍तेत राहीले आहेत. मंत्री पदही त्यानी भोगले आहे. परंतू मराठा आरक्षणाच्‍या ( Maratha Reservation) संदर्भात कधीही पुढाकार घेतल्‍याचे दिसले नाही. ते ज्‍यांच्‍या नेतृत्‍वाखाली काम करतात, त्‍या शरद पवारांनीच मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असे वक्‍तव्‍य करुन, समाजाच्‍या तोंडाला पान पुसली. याचा सोयीस्‍कर विसर थोरातांना पडला (Radhakrishna Vikhe) आहे.

16 टक्‍के आरक्षण घालविण्‍यातच

शरद पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली राज्‍याच अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारमध्‍ये सुध्‍दा मंत्री राहीलेले आणि त्‍यानंतर स्‍वत:ला भावी मुख्‍यमंत्री म्‍हणून मिरवून घेणारे बाळासाहेब थोरात मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात शब्‍दही काढताना दिसले नाहीत. उलट मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेले 16 टक्‍के आरक्षण घालविण्‍यातच महाविकास आघाडी सरकारने धन्‍यता मानली. राज्‍यात जेव्‍हा युती सरकार आले, तेव्‍हा मराठा समाजाला न्‍याय देण्‍याची भूमिका घेतली गेली. आमच्‍या शासन आदेशावर बोलण्‍यापेक्षा बाळासाहेब थोरात यांनी आत्‍मपरिक्षण करण्‍याची गरज असल्‍याचा सल्‍ला मंत्री विखे पाटील यांनी दिला.

ओबीसी समाजाच्‍या संदर्भात

ओबीसी समाजाचे नेते लक्ष्‍मण हाके यांच्‍या सुरु असलेल्‍या आंदोलनावर प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, यापुर्वी ओबीसी समाजाच्‍या संदर्भात निर्णय झाले, तेव्‍हा मराठा समाजाने त्‍या विरोधात कधीही आंदोलन केलेले नाही. मात्र, आताच काही लोकांनी मराठा समाजाच्‍या संदर्भात झालेल्‍या निर्णयाच्‍या विरोधात आंदोलन करुन केवळ स्‍वत:च्‍या हट्टासाठी सामाजिक तेढ निर्माण करण्‍याचे काम सुरु केले आहे. मी यापुर्वीही त्‍यांना सल्‍ला दिला आहे, इतर समाजाच्‍या आरक्षणात तुम्‍ही लुडबुड का करता? उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍या संदर्भात केलेले वक्‍तव्‍य म्‍हणजे लक्ष्‍मण हाके आपली राजकीय अपरिपक्‍वता सिध्‍द करीत असल्‍याचे विखे पाटील म्‍हणाले.

हैद्राबाद गॅझेटीअर मधून दाखले मिळण्‍यासाठी तातडीने कार्यवाही करण्‍यासाठी उपाय योजना करण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यासाठी गावपातळीवर समितीही नेमण्‍यात आली आहे. त्‍याचा आढावा जिल्‍हाधिकाऱ्यांच्या माध्‍यमातून घेतला जाणार आहे. याची प्रक्रिया सुरु झाल्‍यानंतर अनेक गोष्‍टी स्‍पष्‍ट होतील, असे त्‍यांनी सांगितले.

महायुती सरकार नेहमीच सकारात्‍मक

मराठा समाजातील संघटना आणि संस्‍थाच्‍या वतीने केलेल्‍या सत्‍काराबद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करुन मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, आरक्षणाच्‍या संदर्भातील प्रश्‍नांच्‍या सोडवणूकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार महत्‍वाचा होता. ओबीसी समाजाच्‍या आरक्षणाला कुठेही धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्‍याची भूमिका ही महायुती सरकारची नेहमीच सकारात्‍मक राहिली. मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी उपसमितीच्‍या माध्‍यमातून काम करण्‍याच्‍या दिलेल्‍या संधीमुळेच ऐतिहासिक निर्णय होवू शकला. समाजाच्‍या प्रश्‍नांच्‍या सोडवणूकीसाठी योगदान देता आले, याचे समाधान असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube