जनतेच्या भक्कम साथीमुळेच विकासकामांना वेग; आमदार तनपुरेंनी नागरिकांचे मानले आभार
Mla Prajakt Tanpure : येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका असल्याने विद्यमान आमदारांकडून आपल्या मतदारसंघांमध्ये जोरदार विकासकामांचा धडाका सध्या सुरु आहे. विकास कामांचा शुभारंभ तर काही ठिकाणी प्रत्यक्षात झालेल्या कामांचे उदघाटन सुरु आहे. अशातच राहुरी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे (Mla Prajakt Tanpure) यांच्या पुढाकारातून अनेक विकासकामे सुरु आहेत. जनतेची भक्कम साथ आहे, यामुळेच हे कार्य माझ्या हातून घडते आहे, याचे मला समाधान आहे, या शब्दांत आमदार तनपुरे यांनी जनतेचे आभार मानले आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगांव उज्जैनी, सैनिकनगर आणि वडारवाडी गावासाठी 35 लक्ष 25 हजार रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पार पडले. वडारवाडी येथे ड्रेनेज लाईन, केकती येथे बंदिस्त गटार योजना, पिंपळगाव उज्जैन येथील मंदिर सभामंडप बांधणे, रस्ता डांबरीकरण, पेव्हर ब्लॉक अशी विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. स्थानिकांच्या मूलभूत सोयीसुविधा टप्प्याटप्प्याने पार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनतेची भक्कम साथ आहे, यामुळेच हे कार्य माझ्या हातून घडते आहे, याचे मला समाधान असल्याचं तनपुरे म्हणाले आहेत.
भारत सरकारचा मोठा निर्णय, 6 कॅनडा उच्चायुक्तांची हकालपट्टी, ‘या’ दिवसापर्यंत देश सोडण्याचे आदेश
तसेच राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे गावासाठी 77 लक्ष 27 हजार रूपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. येथे रस्ता खडीकरण, काँक्रिटीकरण, हिंदू स्मशानभूमी विकास, पिण्याचे शुद्ध पाणी यासह विविध कामे मार्गी लावण्यात आली आहेत. तर तालुक्यातील बारागाव नांदूर गावासाठी 1 कोटी 59 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले.
रस्त्यावर मुरुम टाकणे, काँक्रिटीकरण, डांबरीकरण, खडीकरण तसेच खोलेश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, मारुती मंदिर व कानिफनाथ मंदिर परिसरात बोअरवेल, स्ट्रीट लाईट बसविणे, अंगणवाडी इमारत बांधणे अशा महत्वाच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. गावाचे गावपण जपत गावाचा विकास आणि उन्नती झालीच पाहिजे, हा माझा आग्रह असल्याचंही तनपुरेंनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राहुरी तालुक्यातील डिग्रस गावासाठी 1 कोटी 52 लक्ष रूपयांच्या विविध विकास कामांचे शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. नगर-मनमाड रस्ता ते डिग्रस रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, तलाठी कार्यालयाची इमारत, कोयबामाळ रस्ता क्रॉक्रीटीकरण, नवीन ट्रान्सफॉर्मर, सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणे आदी कामांचा यात समावेश आहे. ग्रामस्थांनी आज अजून काही रस्त्यांच्या कामांविषयी मागणी केली आहे. हा विषय देखील मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे, असा विश्वास यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.