विरोधकांकडून काका कोयटेंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, पत्रकार परिषदेत काय म्हणाले गंगुले?
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि राष्ट्रवादीचे ३० नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असं ते म्हणाले.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस (Nagar) पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्याचे काम विरोधक करत आहे. ज्यावेळी आशुतोष काळे यांनी नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर केली त्याचवेळी विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली होती. त्यामुळे स्वत:चे उमेदवार सोडून विरोधी सर्व पक्षाच्या उमेदवारांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना न्यायालयाने चपराक दिली. त्यामुळे अजूनच निवडणूक त्यांच्यापासून दूर गेली. होणाऱ्या निवडणुकीत आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्यावर वैयक्तिक टीका, खोटे आरोप आणि दिशाभूल केली जात आहे.
परंतु, निवडणूक निवडणुकीप्रमाणेच लढा, खालच्या पातळीवर जावू नका, अन्यथा आम्हालाही तुमचे पितळ उघडे करावे लागेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोल्हे गटाला दिला. काही दिवसांपूर्वी कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे यांच्या वर चुकीचे आरोप करून समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला.
या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, शिवाजी ठाकरे, प्रकाश दुशिंग, विरेन बोरावके, अशोक आव्हाटे, विजय त्रिभुवन उपस्थित होते. यावेळी सुनील गंगुले पुढे म्हणाले की, निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली जायला हवी मात्र विरोधक खालच्या पातळीवर जाऊन आरोपांचे राजकारण करीत आहे. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे यांनी मागील ३० ते ३५ वर्षांपासून समता पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो गरजू लोकांना आर्थिक मदत दिली आहे.
पतसंस्थेतील काही मोजक्या कर्जदारांनी थकीत कर्ज प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती, त्यापैकी चार व्यक्तींना खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी किरकोळ दंड ठोठावण्यात आला तर तीन याचिका न्यायालयाने तथ्यहीन ठरवत दाखलच करून घेतल्या नाहीत हि वस्तुस्थिती असतांना विरोधक मात्र, कोपरगावकरांची दिशाभूल करीत आहे. मात्र त्यांनी अशा कितीही अफवा पसरवल्या तरी २० तारखेला होणाऱ्या निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव अटळ असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार काका कोयटे आणि राष्ट्रवादीचे ३० नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले.
यावेळी शिवाजी ठाकरे यांनी सांगितले की, २०१९ नंतर कोपरगाव शहर आणि विधानसभा मतदारसंघाचा विकास जलद गतीने झाला आहे. आ.आशुतोष काळे यांनी नागरिकांना दिलेली वचने पूर्ण केली असून पाणी पुरवठा, रस्ते आणि व्यापारी संकुलासह अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. कोपरगाव शहर उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करीत असून हा विकास आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वामुळेच साध्य झाला आहे.
काका कोयटे किंवा संदीप कोयटे यांच्यावरचे कोणतेही आरोप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत.उलट संदीप कोयटे यांना सीबीआयने क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे केवळ राजकीय हेतूने केलेले आहेत. छाननीच्या वेळी हरकती नोंदविल्या नाहीत आणि नंतर न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक लांबणीवर गेली. हे पाप विरोधकांचे असून प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणे ही त्यांची जुनीच खोड असल्याची टीका शिवाजी ठाकरे यांनी केली.
रिपाईचे नेते प्रकाश दुशिंग हे म्हणाले की, कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे नाव बदलून समता वाचनालय करण्याचा आरोप विरोधकांच्या सांगण्यावरून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी काही व्यक्तींकडून समाजाचा उपयोग केला जात आहे. समाज कुणाला बांधील नाही चुकीचे आरोप करून स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी समाजाचा उपयोग करून घेणाऱ्यांच्या तोंडी समाजाप्रती बेगडी प्रेम असून समाज अशा प्रवृत्तींना समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.
आशुतोष काळे व काका कोयटे यांच्यावरील चुकीची टीका खपवून घेतली जाणार नाही. या वाचनालयात ज्यांची पुस्तक घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही अशा सर्व समाजातील युवा पिढी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. समाजात तेढ निर्माण करण्यासाठी चुकीची अफवा पसरविली जात असून स्वत:च्या स्वार्थासाठी जे चुकीचे आरोप करीत आहे त्यांना काळे परीवाराने अनेकवेळा राजकीय संधी दिल्या आहेत. यामुळे त्यांनी तथ्यहीन आरोप करून समाजाची दिशाभूल करू नये व समाजाची माफी मागावी असे आवाहन यांनी केले.
राष्ट्रवादीचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव म्हणाले की, कोपरगाव शहराचा विकास आ.आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे चालला आहे. शहराच्या अनेक समस्या सोडविण्यात आ.आशुतोष काळे यांना यश आले असून कोपरगाव शहर उज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहे. आपल्या कामाच्या जोरावर आ.आशुतोष काळे यांनी जनतेच्या मनात जागा निर्माण केली आहे. पंरतु विरोधक सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीकेचे आणि बदनामीचे राजकारण करीत आहे.
विरेन बोरावके म्हणाले की, विरोधक कोपरगाव नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा काय विकास करणार आहे नागरिकांना काय सुविधा पुरविणार आहे हे जनतेला सांगायचे सोडून आ.आशुतोष काळे यांच्यावर सोशल मिडीयाच्या माध्यमातून टीका आणि आरोप करीत आहे. या चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोपांमुळे कोपरगाव शहराची बदनामी आणि अपमान विरोधकांकडून केला जात आहे. मैदानाची लढाई हि मैदानात झाली पाहिजे परंतु पराभव दिसत असल्यामुळे विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचे त्यांनी सांगितले.
