नाशिक : पोलीस निरीक्षकांची स्टेशनमध्येच आत्महत्या; सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात झाडली गोळी
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक नजन (वय 40) यांनी स्वतःवर झाडत आत्महत्या केली आहे. आज (20 फेब्रुवारी) सकाळी ड्युटीवर असताना स्थानकातील केबिनमध्येच त्यांनी स्वतःच्या सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. नजन यांच्या आत्महत्येने पोलिस आयुक्तालयात (Nashik Police) खळबळ उडाली आहे. (Police Inspector Ashok Najan of Ambad Police Station committed suicide by shooting himself)
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक अशोक निवृत्ती नजन हे मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर येथील रहिवासी होती. 2005 साली ते पोलीस दलात दाखल झाले. तर जुलै 2023 पासून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे विभागात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचे पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख होते. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. कामाच्या बाबतीतही त्यांनी आपला चांगलाच वचक निर्माण केला होता.
उत्तर प्रदेशात ‘सपा’ला धक्का! निवडणुकीआधीच ‘या’ दिग्गज नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
आज नेहमीप्रमाणे सकाळी सव्वा नऊच्या दरम्यान ते आपल्या ड्युटीवर आले आणि तडक केबिनमध्ये गेले. अवघ्या दहा मिनिटात म्हणजे 9.25 च्या दरम्यान, केबिनमधून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच धावपळ उडाली. सहकाऱ्यांनी केबिनकडे धाव घेतली असता नजन आपल्या खुर्चीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नजन यांनी आपल्या सर्विस रिवॉल्वरमधून डोक्यावर उजव्या बाजूने गोळी झाडली होती. ही गोळी त्यांच्या नाकपुडीतून बाहेर आली होती.
‘उद्धव ठाकरेंचाही आमच्यावरच विश्वास’; विधेयक मंजुरीनंतर फडणवीसांची बोचरी टीका
सहकाऱ्यांनी कंट्रोल रुमला याबाबत माहिती देत तातडीने नजन यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच आयुक्तालयाचे विशेष पथक पोलिस ठाण्यात दाखल झाले. अंबड युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी सांगितले की, कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, मात्र पुढील तपास सुरु आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.