प्राजक्त तनपुरे ना घर के ना घाट के ? राष्ट्रवादीविरोधात भूमिका नडणार

Rahuri Assembly by election-बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी होणार आहे ?

  • Written By: Published:
Rahuri By Election

Rahuri Assembly by election-आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागलीय. भाजपकडून शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा युवा नेते अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. अक्षय कर्डिले हे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. दुसरीकडे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनीही मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली. तनपुरे यांनी निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस राहुरीची पोटनिवडणूक लढेल का ? प्राजक्त तनपुरे यांची बदलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे स्वीकारतील का ? हेच आपण जाणून घेऊया…

2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून मतदारसंघ खेचून आणला होता. पहिल्याच टर्मला ते महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ऊर्जामंत्री झाले. पण ते मतदारसंघात होल्ड राखू शकले नाही. दुसरीकडे शिवाजीराव कर्डिले हे मतदारसंघात सक्रीय राहिले आणि 2024 ला पुन्हा आमदार झाले. कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांना तब्बल 34 हजार मतांच्या फरकाने पराभव केला. पण वर्षभरानंतर शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधनामुळे पोटनिवडणूक लागली आहे. ही पोटनिवडणूक लढण्याच्या दृष्टीने प्राजक्त तनपुरे हे तयारी करताना दिसत आहे. परंतु वर्षभरात काही गोष्ट त्यांच्याविरोधात गेल्या आहेत.

राहुरी कारखाना ताब्यात घेतला पण..

राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे. या कारखान्यावर सहाशे कोटींहून अधिक कर्ज आहे. हा कारखाना जप्त आहे. या कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यात माजी खासदार प्रसाद तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाने विरोधकांचा पूर्ण धुव्वा उडवत कारखाना ताब्यात घेतला आहे. हा कारखाना ताब्यात घेतल्यानंतर एक हंगाम झाला आहे. परंतु तनपुरे यांना हा कारखाना सुरू करता आलेला नाही. कर्ज भेट नसल्याने हा कारखाना सुरू होऊ शकलेला नाही, असे तनपुरे यांनीच अनेकदा जाहीर केलेले आहे. परंतु मोठा गाजावाजा करत कारखाना ताब्यात घेतला पण कारखाना सुरू केलेला नाही, त्याची नाराजी ऊस उत्पादकांमध्ये आहे. कारखाना ताब्यात घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे चुलते अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेले.


राहुरी नगरपालिका ताब्यात पण पक्षाचे अस्तित्व नाही

प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेवर आपली सत्ता राखलेली आहे. तनपुरे यांनी निवडणुकीसाठी शहर विकास आघाडी स्थापन केली होती. या आघाडीने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या. पण भाजपचे अवघे सात नगरसेवक निवडून आले. तनपुरे यांची होमग्राउंडवर ताकद दिसली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे चिन्ह मात्र निवडणुकीत नव्हतं.


बदलेली भूमिकेचा पक्षाला फटका ? लंकेंची भूमिका काय ?

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका सध्या बदलेली दिसत आहे. तनपुरे यांनी नुकतीच मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढली होती. प्राजक्त तनपुरे यांच्या डोक्यात अनेकदा भगवी टोपी दिसली, गळ्यातील गमछेही भगवेच होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मानणारी मुस्लिम, दलित व्होट बँकही आहे. राहुरी शहरात, काही गावांत ही व्होट बँक जास्त आहे. परंतु तनपुरे यांच्या बदलेल्या राजकीय भूमिकेमुळे राष्ट्रवादीला फटका बसू शकतो, असे बोलले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंकेही या निवडणुकीबाबत काही बोलले नाहीत. हा मतदारसंघ त्याच्या मतदारसंघात येतो. तेही तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेत दिसले नाहीत. तनपुरे यांना न मानणारे पण लंकेंना मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. या यात्रेत लंके हे न दिसणेही तनपुरेंसाठी धोक्याची घंटा आहे.

<राष्ट्रवादी निवडणूक लढेल का ? बारामतीची पोटनिवडणूक न लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने घेतलाय. त्यामुळे येथील निवडणूक बिनविरोध होण्याच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. बारामतीप्रमाणे राहुरीत उमेदवार न देण्याचा निर्णय झाल्यास प्राजक्त तनपुरे यांची राजकीय कोंडी होणार आहे ? सध्या प्राजक्त तनपुरे यांची राजकीय भूमिका बदलेली आहे. ते पक्षापासून दूर जाताना दिसत आहे. तर भाजपशी जवळीक त्यांनी कशाच्या आधारावर साधली, त्यांना भाजपचे तिकीट मिळेल असे का वाटत होते, भगवी टोपी घालून आपण भाजपला खुश करू शकतो असा विश्वास कशामुळे त्यांना आला, या साऱ्या बाबी अजून पुढे आल्या नाहीत. त्यांच्या बदलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे केडर त्यांच्यावर नाराज आहे. या साऱ्या बाबीमुळे दोन्ही बाजूंचा पाहुणा म्हणून तनपुरे उपाशी तर राहणार नाहीत ना, अशीच शंका येत आहे.

follow us