संगमनेरमध्ये गटार सफाई करताना दोघांचा मृत्यू, निष्काळजीपणाचा आरोप, ठेकेदारांविरुध्द गुन्हा दाखल

Two die while cleaning sewer : संगमनेर शहरात नगरपालिकेने (Sangamner Municipality) सांडपाणी व्यवस्थापनासाठी एसटीपी प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत भूमिगत गटारांचे जाळे टाकण्यात आले आहे. दरम्यान, भूमिगत गटार सफाई दरम्यान झालेल्या दुर्घटनेत दोघांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी नगरपालिकेच्या ‘एसटीपी’ प्रकल्पाच्या कंत्राटदार कंपन्या मे. आर.एम. कातोरे अँड कंपनी आणि बी.आर. क्लीनिंग यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात (Sangamner Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Delhi Earthquake: मोठी बातमी, दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के
सविस्तर वृत्त असे की, काल (गुरुवारी) कोल्हेवाडी रोडवर गटार सफाईचे काम सुरू असताना गटारात उतरलेल्या अतुल रतन पवार (वय १९, रा. संजय गांधीनगर, संगमनेर) आणि रियाज जावेद पिंजारी (वय २१, रा. मदिनानगर, संगमनेर) यांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर पालिकेचे आरोग्य अधिकारी अमजद बशीर पठाण यांनी मध्यरात्री शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनंतर एसटीपी प्लांटच्या मुख्य कंत्राटदार कंपनीचे रामहरी मोहन कटोरा आणि निखिल रामहरी कातोरे (दोघेही रा. गोविंदनगर, संगमनेर) आणि बीआर क्लीनिंगचे कंत्राटदार मुश्ताक बशीर शेख (रा. शिवाजीनगर, संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
IT ची नोटीस, दानवेंचे गंभीर आरोप अन् फडणवीसांकडून चौकशी; संजय शिरसाट कसे फसले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदारांनी पालिकेसोबत केलेल्या कराराच्या अटींचे उल्लंघन केले. त्यांनी स्वच्छता कामगारांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली नाही. तसेच आरोग्य विभागाच्या परवानगीशिवाय आणि आवश्यक सुरक्षा उपकरणांशिवाय सफाई कर्मचाऱ्यांना गटारात उतरवले. कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असतानाही निष्काळजीपणा केल्याचा आरोप आहे.
गटार साफ करताना दोन जणांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायक आहे. संबंधित कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे हे मृत्यू झाले आहेत. तरी ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी केली.
तर मृतांच्या कुटुंबियांना नगरपालिका किंवा सरकारने तात्काळ प्रत्येकी ५० लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी विधान परिषदेमध्ये केली.
दरम्यान, या घटनेचा पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत. मात्र, अद्याप अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.