विखे-जगताप जोडी पुन्हा दक्षिणेत, अजितदादांकडून निवडणुकीसाठी जगतापांवर मोठी जबाबदारी
Sangram Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. तर झेडपी आणि महानगरपालिकांचे प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत झाली आहे. या निवडणुकीत समन्वय साधण्यासाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षांकडून निवडणूक प्रभारी नेमण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Sangram Jagtap Appointment as election in-charge of Ahilyanagar-South)
मध्यंतरी आमदार संग्राम जगताप यांनी मुस्लिमविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे पक्षाने संग्राम जगताप यांना नोटीसही बजाविली होती. आमदार संग्राम जगताप यांनी पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर संग्राम जगताप यांनी वादग्रस्त विधाने टाळली. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.
बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार की तेजस्वी होणार मुख्यमंत्री, वाचा एक्झिट पोलचा अंदाज
भाजपची जबाबदारी सुजय विखेंवर
गेल्याच आठवड्यात भाजपने निवडणूक प्रभारी जाहीर केले आहेत. माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडे भाजपने दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी दिलीय. आता राष्ट्रवादीचे जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे आहे. तसे नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
महानगरपालिकेत झेंडा फडकविण्यासाठी जबाबदारी
अहिल्यानगर महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी राजकीय जादू घडवून आणल्या आहेत. शिवसेनाला बाजूला करून संग्राम जगताप यांनी भाजपला महापौर बसविला होता. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून राष्ट्रवादीचा महापौर बसविण्याची जबाबदारी जगताप यांच्यावर असणार आहे. आमदारकीच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी अनेक विकासकामे केली आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांचे क्रॉंक्रिटीकरण करण्यात आले आहेत. तर काही कामे सुरू आहे. त्यामुळे संग्राम जगताप हे विकासकामांचे जोरावर महानगरपालिकेत मते मागू शकणार आहेत.
