भगतसिंग कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वादंग; संदीप देशपांडे व संजय राऊतांकडून प्रत्युत्तर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 28

Political controversy over Bhagat Singh Koshyari’s statement : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शब्दयुद्ध रंगले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संदर्भातील वक्तव्यांमुळे वातावरण तापले आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, संघाशी जोडले जाणारे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरत नाहीत. ते राज ठाकरे यांचा आदर करतात, मात्र ते मोदींना जास्त घाबरतात असे वाटते. राज ठाकरेंनी घाबरू नये आणि पंतप्रधानांच्या जवळ जावे. त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत.

महाराष्ट्रातले असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही; घाबरायचे असेल तर चुकीच्या कामांसाठी घाबरा, असे कोश्यारी यांनी सूचक विधान केले. या वक्तव्यावर मनसे आणि इतर विरोधी नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारींवर कडक शब्दांत टीका केली. कोश्यारी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भूमिकेत कसे, असा सवाल करत त्यांनी वैयक्तिक पातळीवरही टोला लगावला.

मोदींना कोण घाबरत आहे? सत्तेच्या आणि केंद्रीय यंत्रणांच्या जोरावर बोलू नका. आधी स्वतःकडे पाहा आणि मग महाराष्ट्राला शिकवण्याचा प्रयत्न करा, अशा शब्दांत राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही कोश्यारी यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्या नावावरून उपरोधिक टिप्पणी करत, आज क्रांतिकारक भगतसिंग जिवंत असते तर त्यांनी कोश्यारींना चांगलाच धडा शिकवला असता, असे वक्तव्य केले.

रोहित पवारांच्या दाव्याला हिंदुरावांचा दुजोरा; शेवटच्या क्षणी का घेतला विमान प्रवासाचा निर्णय?

तसेच चंद्रपूर महापालिकेतील घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी काही नगरसेवकांना मोठ्या रकमेच्या ऑफर देण्यात आल्याचा दावा केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात आणखी खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका विशेष कार्यक्रमाची देशभरात चर्चा सुरू आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील काही दिग्गज कलाकार उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले.

यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी या उपस्थितीवर सडकून टीका केली. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली मंडळी संघाच्या विचारांवर प्रेम असल्यामुळे आलेली नव्हती, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारी यंत्रणांच्या भीतीमुळे तेथे बसली होती, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. या सर्व वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे. संघ, केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील प्रादेशिक राजकारण यांच्यातील संबंधांवरही या प्रकरणामुळे नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

follow us