राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चांदरम्यान पार्थ पवारांची फडणवीसांना भेट; आनंद परांजपे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर
खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसरीकडे आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची घेतली भेट.
Political movements in the Nationalist Party gain momentum : राज्यातील राजकारणात गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा रंगत असतानाच, पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व बातम्या फेटाळून लावल्या. मात्र, विविध घडामोडी आणि नेत्यांच्या हालचालींमुळे राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसरीकडे आनंद परांजपे यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट, या दोन्ही घटनांनी राजकीय चर्चांना आणखी वेग दिला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास ही भेट झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पार्थ पवार हे एकटेच या भेटीसाठी गेले होते, अशी देखील माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्वाचे पाहिले जात आहे. पक्षातील काही बडे नेते नाराज असल्याच्या चर्चा आधीच सुरू असताना, पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात नव्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शांतता करार नाही तर इराणला वाईट काळाचा सामना करावा लागेल, ट्रम्प यांच्या वक्तव्याने खळबळ
राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे, हा प्रश्न आता अधिक ठळकपणे उपस्थित केला जात आहे. पक्षातील काही नेत्यांना डावलले जात असल्याची चर्चा रंगत आहे. तर काही नेते स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत राष्ट्रवादीत मोठे राजकीय बदल घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर या संपूर्ण परिस्थितीत भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार, याविषयी देखील उत्सुकता वाढली आहे.
नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण हादरलं; नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
दरम्यान, दुसरी महत्वाची राजकीय घडामोड म्हणजे आनंद परांजपे यांची सिल्व्हर यॉर्कवरील भेट. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आनंद परांजपे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. मूळचे शिवसैनिक असलेले आनंद परांजपे यांनी काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जवळपास चौदा वर्षे त्यांनी राष्ट्रवादीत काम केलं. मात्र पक्षातील फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांची साथ दिली होती. तरी देखील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी स्वतः देखील नाराजीचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
परांजपे यांच्या या निर्णयामागे नेमके कोणते राजकीय गणित आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे. राजकीय घड्याळ बिघडू नये म्हणून त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याचा बोललं जात आहे. शिवसेनेत पुरागमन केल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असले, तरी तिचे राजकीय अर्थ देखील काढले जात आहेत. विशेष म्हणजे, अजित पवार गटात राहून देखील परांजपे अचानक पक्षातून बाहेर पडले, यामागे नेमकी कोणती नाराजी होती, याची देखील चर्चा रंगत आहे.
एकीकडे राष्ट्रवादीतील नाराजीच्या चर्चा, दुसरीकडे नेत्यांच्या गाठीभेटी आणि बदलणारी राजकीय समीकरणे यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.