भाजपविरोधातील नाराजी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल; राजकीय परिस्थितीवर प्रदीप कंद यांचे भाष्य

पुढाऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या लोणीकंदने जिल्ह्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील.

  • Written By: Published:
Untitled Design (380)

Pradeep Kand’s commentary on the political situation : अडचणी शेतकऱ्यांच्या नसून प्लॉटिंगमधील मतदारांच्या आहेत. ड्रेनेज आणि रस्त्यांचा प्रश्न गंभीर आहे, असं स्पष्ट मत जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप कंद यांनी व्यक्त केलं. प्लॉटिंगमधील रस्त्यांवर हक्क हा प्लॉटिंग करणाऱ्या मालकाचाच असतो. जोपर्यंत तो बक्षिसपत्र करत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी निधी टाकता येत नाही किंवा काम करता येत नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ही कामं मार्गी लावता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदारसंघातील दुसरं मोठं आव्हान एमएसीबीचं असून तिसरं आणि अत्यंत गंभीर आव्हान म्हणजे बिबट्यांचा वाढता उपद्रव असल्याचं त्यांनी सांगितलं. रात्री नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आम्ही लोकांना सांगतो. शेतकरी देखील प्रचार थांबवण्याची विनंती करतात, कारण बिबट्यांची भीती आहे, असं ते म्हणाले. फेब्रुवारी अखेरपर्यंत ऊस तोड संपेल, त्यानंतर बिबट्यांचा प्रश्न अधिक उघडपणे समोर येईल. वनखात्याचं धोरण अतिशय क्लिष्ट असून अनेक वेळा लोकांचा जीव गेल्यानंतरच पिंजरे लावले जातात, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी झाल्यावर बिबट्यांच्या प्रश्नावर ठोस काम करणार, असं आश्वासन त्यांनी दिलं.

राजकीय परिस्थितीवर बोलताना प्रदीप कंद म्हणाले की, आमच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. नगरपालिका स्तरावरही तेच चित्र आहे. भाजपमध्ये असणाऱ्यांपैकी अनेक नेते अजित पवारांनीच घडवले आहेत. भाजपविरोधातील नाराजी ही जिल्हा परिषद निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येईल. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची मला खात्री आहे.

ब्रेकिंग : मुंबईत महापौर निवडीपूर्वी भाकरी फिरली; पवारांच्या एकमेव नगरसेवकाचा शिंदेंना पाठिंबा

दरम्यान, लोणीकंद गाव या निवडणुकीत ‘गेमचेंजर’ ठरण्याची चर्चा आहे. पुढाऱ्यांचं गाव म्हणून ओळख असलेल्या लोणीकंदने जिल्ह्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच मी गावातून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. गाव नेहमीच वेळप्रसंगी आपल्या माणसाच्या पाठीशी उभं राहतं. यावेळीही संपूर्ण गाव माझ्या मागे उभं राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी आमदार माउली कटके आणि अशोक पवार यांच्याशी झालेल्या मनोमिलनावर देखील भाष्य केलं. माझ्या मतदारसंघापुरतं तरी हे मनोमिलन झालं आहे. चर्चा करून सगळे सोबत आले आहेत, असं त्यांनी सांगितलं. माउली कटके यांचं कौतुक करताना त्यांनी त्यांना ‘स्ट्रेट फॉरवर्ड आमदार’ असं संबोधलं. काम करणारा माणूस आपल्याकडे आला तर त्याला ताकद द्यायची, अधिकार द्यायचे, हीच त्यांची भूमिका आहे, असं ते म्हणाले.

समोरच्या उमेदवाराच्या टीकेला उत्तर देताना प्रदीप कंद म्हणाले, तुम्ही माझ्याकडे पाहून मतदान करा. माझ्या पाठीशी माउली आबा कटके मोठ्या भावासारखे उभे आहेत. ते थेट लोकांना सांगत आहेत की प्रदीप कंद यांना मतदान करा, काहीही कमी पडू देणार नाही. यावेळी त्यांनी भावनिक होत अजित पवारांच्या निधनाचा उल्लेख करत 28 तारखेचा दाखल दिला. 28 फेब्रुवारीला माझे वडील गेले आणि आज 28 तारखेलाच माझा राजकीय गुरु गेला. हा आकडा माझ्यासाठी दुर्दैवी ठरला आहे, असं त्यांनी सांगितलं. 15 वर्षे स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची सेवा केली आहे. आता जनता मला साथ देईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आपलं मनोगत मांडलं.

follow us