काही झारीतल्या शुक्राचार्यांमुळं अडचण; जरांगे पाटलांच्या उपोषणावरून लाड यांचा खळबळजनक दावा
संबंधित समितीचे प्रमुख म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काम करत असून, त्यांच्या माध्यमातून या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange) यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार निश्चितपणे विचार करेल आणि संविधानिक मार्गाने त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका भाजप नेते प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. जरांगे पुन्हा आंदोलनाला बसले आहेत, मात्र त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचंही लाड यांनी स्पष्ट केलं. तिकडं गेल्याशिवाय तोडगा निघणार नाही, असं म्हणत त्यांनी चर्चेतून मार्ग काढण्याची भूमिका मांडली.
मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे सरकारच्या विचाराधीन आहेत. मात्र, हे मुद्दे सत्तेच्या पातळीवर अपेक्षित पद्धतीने पुढं आले नाहीत, अशी खंतही प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. याआधीही आपण काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत बोललो असल्याचं त्यांनी सांगितलं. झारीतल्या शुक्राचार्यांमुळं काही अडचणी निर्माण होत असून, हा त्रास कसा कमी करता येईल यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असं लाड म्हणाले. संबंधित समितीचे प्रमुख म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काम करत असून, त्यांच्या माध्यमातून या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिंदेंकडे गुदगुली करण्याचे गुण, जरांगेंना 100 टक्के त्यांचाच पाठिंबा; सदावर्तेंचा पुन्हा गंभीर आरोप
काही अधिकारी वर्गाकडून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोपही लाड यांनी केला. काही अधिकारी वर्ग झारीतल्या शुक्राचार्यांचं काम करत आहे, असं म्हणत त्यांनी प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. मात्र, या सर्व अडचणींवर चर्चा आणि संविधानिक प्रक्रियेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि त्यावर पुढं कोणता निर्णय होणार, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची भूमिका घेतल्याबाबत प्रसाद लाड यांनी भाष्य केलं. ‘मोर्चा काढणं हा सगळ्यांचा अधिकार आहे. मला असं वाटतं की ते मुंबईला न येता उपोषणाला बसले आहेत. आमचं एक शिष्टमंडळ त्यांच्यासोबत चर्चा करत आहे, असं लाड यांनी सांगितलं. त्यामुळं मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या दोन्ही बाजूंशी संवाद साधून समतोल तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे.