‘डॉ. तावरे एक कर्तव्यदक्ष अधिकारी..,’ ससूनमध्ये चिखल करणारं आमदार सुनील टिंगरेंचं ‘ते’ पत्र व्हायरल
Pune Car Accident : पुण्यातील कल्याणीनगर (Kalyaninagar) परिसरातील पोर्शे कार अपघात (Porsche Car Accident) प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आरोपी अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससूनचे फॉरेन्सिक लॅबचे एचओडी डॉ. अजय तावरे आणि सीएमओ डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
गुन्हे शाखेने अटक केलेल्या अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre) यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याकडे केली होती. त्यानंतरच अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. या शिफारसीचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी या पत्रात लिहिले आहे की ” मा. महोदय, उपरोक्त विषयान्वये माझ्या परिचयाचे डॉ. अजय अ. तावरे हे प्राध्यापक व विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक या पदावर, ससून सर्वोपचार रुग्णालयात कोविड 19 च्या काळात उत्तम कर्तव्य पार पाडलेले आहे. तरी डॉ. अजय अ. तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदाचा अतिरीक्त कार्यभार देणेबाबत आपल्या स्तरावर उचित कार्यवाही व्हावी ही विनंती.” यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ससूनच्या अधीक्षकपदी अजय तावरे यांची नियुक्ती केली.
दोन दिवसात नियुक्ती
आमदार सुनील टिंगरे यांच्या या शिफारसी पत्रावर विनंती प्रमाणे अतिरिक्त कारभार त्यांना देण्यात यावा. नियमाप्रमाणे प्रोसेजर करण्यात यावे असे समजते. सध्या ज्यांच्याकडे कार्यभार आहे ते निकर्ष पूर्ण करत नाही. असा शेरा मंत्री हसन मुश्रीफ यांनी या पत्रात दिला आहे. अजय तावरे यांची ससूनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी 26 डिसेंबरला मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिले होते तर 28 डिसेंबरला वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी शेरा दिला.
प्रकरण काय
19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याच बरोबर आरोपी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना या प्रकरणात कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
तर दुसरीकडे या प्रकरणात तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नसल्याने येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी दोघांची नावे आहे.
फोन जप्त करा, नार्को टेस्ट करा; अजितदादांचे नाव घेत दमानियांची मोठी मागणी
या प्रकरणात चौकशीसाठी पुणे पोलिसांनी एक इन्टर्नल कमिटी बनवली होती. या कमिटीच्या निर्णयानंतर येरवडा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.