विकासाचा अनुशेष भरून काढायचा एवढ्याच विचाराने मी यावेळी निवडणूक लढतोय -शिवाजीराव कर्डिले
Shivajirao Kardile : महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना मतदारांनी गावोगावी अक्षरशा नाकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्यामुळे विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, युवक,महिला, सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना फोन करून दम देत दहशत निर्माण करत आहेत. मागील वेळी 2019 ला लोकांनी भावनिक होवून आपल्या विरोधात मतदान केलं. (Shivajirao Kardile) परंतु, आता पाच वर्षांनी आपल्या मतदारसंघाचा किती तोटा झाला हे सगळ्यांना कळलं आहे. विकासाचा हा अनुशेष भरून काढायचा एवढाच विचार करून मी यावेळी निवडणुकीला उभा राहिलो आहे. मी गरीबीतून वर आलेलो आहे. त्यामुळे कोणाला कधीही दुखावण्याचा माझा स्वभाव नाही असं प्रतिपादन भाजप उमेदवार शिवजाराव कर्डीले यांनी केलं आहे. ते प्रचार दौऱ्यात बोलत होते.
मी 1995 ला पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासून जनता दरबार घेवून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. समोरचा व्यक्ती कोण आहे हे न पाहता मी त्याचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने मला लबाडी करता येत नाही. म्हणूनच मला जनतेने पाच वेळा विधानसभेत पाठवलं. जे लबाडी करून, गोडगोड बोलताना, त्यांना जनता लवकरच कंटाळते. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या आताच्या लोकप्रतिनिधीने अशीच लबाडी केली व आज जनताच त्यांना पाडण्यासाठी आतूर झाली आहे असंही कर्डीले यावेळी म्हणाले आहेत.
निवडणुक जाहीर झाल्यापासून गावागावतील शेकडो तरूण रोज माझ्याकडे येवून भाजपत प्रवेश करीत आहेत. कारण त्यांचा विद्यमान लोकप्रतिनिधीकडून विकासकामांच्याबाबतीत भ्रमनिरास झाला आहे. यावेळी मला राहुरी तालुक्यातून विक्रमी मताधिक्य मिळणार आहे. त्याबरोबरच आपल्या हक्काच्या नगर तालुक्यानेही भक्कम साथ दिली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी यावेळी राहुरी विधानसभा मतदारसंघातील उपस्थित जनतेला केल आहे.
मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. शेतकरी कुटुंबातील असल्याने दूधाचा व्यवसाय करायचो. मी सगळ्या अधिकाऱ्यांना दूधाचा रतीब घालायचो. त्या माध्यमातून मी गावांची कामं अधिकाऱ्यांना सांगायचो व ते सुध्दा काम करायचे. कारण त्यांच्या मनात असायचे काम नाही केले तर हा उद्या दुधात पाणी घालायचा. दुधवाला म्हणून सगळ्यांशी इतके जवळचे संबंध तयार झाले की ग्राहक दिवाळीला इतका फराळ द्यायचे की घरी फराळ करायची गरज पडायची नाही. आम्ही दुधवाले नगरला दूध घालायला गेलो तर अनेकदा ग्राहकांकडून पैसे मिळायचे नाहीत. त्यामुळे आम्ही 100 दूधवाल्यांची टोळी तयार केली व आमच्या हक्काचे पैसे मिळवायचो. चांगले संघटन केल्यावर 1995 मध्ये मला लोकांनीच विधानसभेसाठी उभे केले. मी विजयी सुध्दा झालो व तेव्हापासून रात्रंदिवस जनतेच्या सेवेत आहे असंही ते यावेळी म्हणाले.
कर्डिले यांच्या उपस्थितीत नगर तालुक्यातील डोंगरगणचे उपसरपंच संतोष पटारे यांच्यासह डोंगरगण, पिंपळगाव माळवी, गावातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून यंदा मतदारसंघात परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राजू शेटे, बाजीराव भुतकर, मांजरसुंबा गावचे सरपंच जालिंदर कदम, राजेंद्र दारकुंडे, कैलास पटारे, बबनराव पटारे, सदाशिव पवार ,शिवाजी साठे, महेश भरडिया, अर्जुन कदम, बाळासाहेब वाघ, बापू तागड, सागर कदम, अशोक मते, कांताबाई भुतकर, आशाबाई कदम, सोपान मते, भाऊ कदम, जयराम कदम, इंद्रभान कदम, एकनाथ गुंड, बापू बेरड, संतोष झिने, वसंत शिंदे, श्रीकांत साठे, सुभाष आढाव, बाजीराव कराळे, अजिंक्य नागवडे, मेजर गुंड आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.