वाहतुकीचा बोजा पोलिसांवरच का?, राज ठाकरेंनी शहरांच्या नियोजनावरही ओढले ताशेरे
Raj Thackeray Traffic Statement : शहरांमधील बेशिस्त वाहतुकीपर्यंतच्या प्रश्नांवर राज ठाकरेंनी परखड भूमिका मांडली.
Raj Thackeray Traffic Statement : महाराष्ट्रातील शहरांमध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, यासाठी केवळ पोलिसांना जबाबदार धरुन चालणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. वाहतुकदारांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी ई-चलानच्या कारभारावर आक्षेप घेतला. वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाई करण्यास विरोध नाही, मात्र चलान आकारण्याची पद्धत योग्य असायला हवी, असे त्यांनी सांगितले. कॅमेर्याच्या माध्यमातून नियमभंगाची नोंद होऊन पारदर्शक पद्धतीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रस्त्यांवर अवजड वाहने उजव्या बाजूने चालवली जातात, तर रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करण्याचे नियमही सर्रास मोडले जातात. दुचाकीस्वारांकडून सिग्नल पाळला जात नाही, तर सिग्नल असतानाही वाहतुक पोलीस उभे ठेवण्याची वेळ येते, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. पूर्वी रात्रीच्या वेळीही मुंबईत सिग्नल पाळले जायचे, मात्र आता दिवसाढवळ्या नियमांचे पालन होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी नियमांची अंमलबजावणी आणि नागरिकांची जबाबदारी या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले.
शहरांमधील पार्किंगच्या समस्येवर उपाय सुचवताना राज ठाकरे यांनी फुटपाथ आणि नो पार्किंगच्या जागा स्पष्टपणे दाखवण्याची गरज मांडली. केवळ नो पार्किंगचे फलक लावून उपयोग होणार नाही, तर अशा ठिकाणी फुटपाथवर लाल रंगाचे पट्टे आणि पार्किंगच्या जागी पिवळ्या रंगाचे पट्टे असावेत, अशी सूचना आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, या सूचनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. अशा योजना राबवण्यापूर्वी नागरिकांना माहिती देणे आणि जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहरांच्या नियोजनावर बोलताना त्यांनी पुण्यातील रस्त्यांच्या प्रमाणाचा मुद्दा उपस्थित केला. शहराच्या एकूण क्षेत्रफळाच्या साधारण 15 टक्के भागात रस्ते असावेत, असे सांगितले जाते, मात्र पुण्यात हे प्रमाण केवळ 7 टक्के असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, इमारतींची संख्या आणि लोकसंख्या वाढत असताना वाहनांची संख्या वाढत आहे, परंतु पार्किंग आणि वाहतुकीचे नियोजन केले जात नाही. विकास आराखडे तयार करताना केवळ इमारती आणि जमिनींचा विचार न करता, शहरातील रस्ते, वाहने, सार्वजनिक वाहतुक, फुटपाथ, मैदाने आणि उद्याने यांचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी सांगितले.
वाहतुकीच्या समस्येचा परिणाम केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून, शहरांच्या एकूण रचनेवर होत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबईसारख्या शहरात रेल्वेवर लाखो प्रवासी अवलंबून आहेत. एखाद्या दिवशी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था विस्कळीत झाली आणि सर्व प्रवासी खासगी वाहनांकडे वळले, तर शहरातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला. शहरांमध्ये फुटपाथवरुन चालणे आणि रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. तलाव बुजवून इमारती उभारणे, मोकळ्या जागा कमी होणे आणि पाण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष होणे, हे अनियोजित विकासाचे परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. शहरांच्या गरजा समजून घेण्यासाठी तज्ज्ञांना विश्वासात घेऊन योग्य नगरनियोजन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वित्झर्लंडमधील वाहतुक व्यवस्था आणि तेथील शिस्तीचा अनुभव सांगताना राज ठाकरे यांनी भारतातील परिस्थितीशी तुलना केली. वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ सरकार किंवा पोलिसांची जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाने स्वतःपासून शिस्तीची सुरुवात करायला हवी, असे ते म्हणाले. पोलिस संरक्षण असतानाही आपल्या चालकांना सिग्नल मोडू नये, अशी सक्त ताकीद देत असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतुकदारांनीही आपल्या चालकांना नियमांचे पालन करण्यास सांगावे आणि सरकारने शहरांच्या नियोजनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. वाहतुकीच्या प्रश्नांवर सरकारसमोर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचे सांगत, शहरांमध्ये शिस्त आणण्यासाठी इच्छाशक्तीची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.