लेट्सअप विशेष : पटेल पुन्हा ‘किंगमेकर’! जैन यांना उमेदवारी देऊन ‘साईडलाईन’ च्या चर्चांना पूर्णविराम…

Praful Patel केवळ राजेंद्र जैनच नव्हे, तर याआधी झिशान सिद्धीकी यांना विधान परिषदेवर पाठवण्यामागे पटेल यांचाचा खारीचा वाटा होता.

  • Written By: Published:
Praful Patel

Praful Patel Again Become King Maker After Rajendra Jain Get Rajya sabha Nomination : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. जैन यांच्या नावाची घोषणा हा केवळ एक निर्णय नसून पक्षाच्या दिल्ली दरबारातील ‘बॅकरूम पॉलिटिक्स’चा एक मोठा विजय मानला जात आहे. छगन भुजबळांसारख्या अनुभवी नेत्यांची दावेदारी असतानाही, राजेंद्र जैन यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली, यामागे प्रफुल्ल पटेल यांची राजकीय खेळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेमकी जैन यांच्या उमेदवारीसाठी पटले यांनी कशी फिल्डिंग लावली त्याबद्दल जाणून घेऊया…

इतरांची मुलंबाळं राज्यसभा, लोकसभेवर, मलाही न्याय हवा… राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर भुजबळांची नाराजी

राजेंद्र जैन कोण आहेत?

सगळ्या पहिले तर, राज्यसभेची उमेदवारी मिळालेले राजेंद्र जैन नेमके कोण आहेत. ते जाणून घेऊया. तर, राजेंद्र जैन मुळचे गोंदिया जिल्ह्यातील आहेत. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी असून, पटेल यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. जैन यांनी विधानसभेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज संस्थेतून 12 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. त्याशिवाय मध्यवर्ती बँक, फेडरेशन या संस्थेमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. राजकीय क्षेत्रासोबतच राजेंद्र जैन यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान असून, ‘गोंदिया एज्युकेशन सोसायटी’चे सचिव म्हणून अनेक वर्षे ते यशस्वीपण काम करत आहेत.

जैन यांच्यासाठी पटेल यांनी कशी फिरवली ‘चावी’?

राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. विदर्भातील राजकारणात पटेलांच्या शब्दाला मान असणे आणि त्या बळावर जैन यांना राज्यसभेवर संधी मिळवून देणे, यात प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला सारून स्वतःच्या पसंतीच्या उमेदवाराला संधी मिळवून देणे हे पक्षातील महत्त्वाच्या निर्णयात आजही प्रफुल्ल पटेल यांचा शब्द अंतिम असल्याचे सिद्ध करते.

झिशान सिद्धीकी आणि पटेलांचे ‘नेटवर्किंग’

केवळ राजेंद्र जैनच नव्हे, तर याआधी झिशान सिद्धीकी यांना विधान परिषदेवर पाठवण्यामागे पटेल यांचाचा खारीचा वाटा होता. कारण, पार्थ पवार हे विक्रम काकडे आणि आनंद परांजपे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. पण, पटेल यांनी पडद्यामागून जोरदार ‘फिल्डिंग’ लावत झिशान यांच्या नावावर शिक्कामोर्बत केले होते. त्यामुळे जुळवून आणलेले हा ताळमेळ त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे उत्तम उदाहरण ठरले.

विक्रम काकडेंच्या विजयाने पवारांनी 14 वर्षांपूर्वीच्या ऋणाचं संजय काकडेंना दिलं राजकीय ‘रिटर्न गिफ्ट’

‘साईडलाईन’च्या चर्चांना पूर्णविराम

गेल्या काही काळापासून प्रफुल्ल पटेल पक्षाच्या मुख्य प्रवाहातून ‘साईडलाईन’ झाल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, पहिले झिशान सिद्धीकी आणि त्यानंतर आता राजेंद्र जैन या दोन नेत्यांच्या उमेवारीनंतर साईडलाईनच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, पक्षात अजूनही पटले यांच्या शब्दात दम असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

पटेल कसे ठरले किंगमेकर कारणं कोणती?

1. दिल्लीवरील पकड : महायुतीमध्ये दिल्लीतील भाजपा नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी प्रफुल्ल पटेल हे पक्षाचा सर्वात महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवर त्यांनी मिळवलेले वर्चस्व हेच दर्शवते की, पक्षाची दिल्लीतील धोरणे अजूनही त्यांच्याच सूचनेनुसार ठरत आहेत.

2. विश्वासू सहकाऱ्यांची फळी : जैन यांच्या निवडीने पटेलांनी हे दाखवून दिले आहे की, ते केवळ स्वतःचे पद टिकवत नाहीत, तर आपल्या जवळच्या सहकाऱ्यांनाही सत्तेच्या केंद्रस्थानी स्थान मिळवून देऊ शकतात.

3. बॅलन्सिंग ॲक्ट :
पक्षात सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांसारखे दिग्गज नेते असताना, प्रफुल्ल पटेल यांनी कोणाशीही थेट संघर्ष न करता, आपल्या ‘सॉफ्ट पॉवर’चा वापर करून निर्णय कसे बदलता येतात, याचे कौशल्य या निमित्ताने सिद्ध केले आहे.

पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही; राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांची स्पष्ट भूमिका

भुजबळ का राहिले रेसच्या बाहेर?

आता हे झाले पटेल यांच्या राजकीय खेळीबाबत पण, राज्यसभेच्या रेसमध्ये भुजबळ मागे का राहिले रेसच्या बाहेर का राहिले? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर, त्यालाही एक नाही अनेक कारण आहेत. सगळ्या पहिलं तर, भुजबळ हे राज्यातील ओबीसी समाजाचे मोठे नेतृत्व मानले जातात. त्यांना दिल्लीच्या राजकारणात म्हणजेच राज्यसभेवर पाठवले असते तर, राज्यातील ओबीसी मतांवर त्याचा परिणाम झाला असता. त्यामुळे त्यांना राज्यातच सक्रिय ठेवणे पक्षाने उचित समजले असावे.

याशिवाय सध्या भुजबळ हे महायुती सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री आहेत. राज्यसभेवर गेल्यास त्यांना राज्य मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यात अजून मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. अशा स्थितीत छगन भुजबळांसारखा अनुभवी आणि आक्रमक नेता मंत्रिपदावरून पायउतार झाल्यास सरकारवर त्याचा परिणाम झाला हे देखील भुजबळांना डावलण्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. तिसरं कारण म्हणजे गेल्या काही काळात आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांची भूमिका काही घटकांसाठी वादाची ठरली होती. अशावेळी भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर, महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये किंवा मतदारांच्या एका वर्गात चुकीचा संदेश गेला असता. हा संदेश जाऊ नये याची दक्षता पक्ष नेतृत्वाने भुजबळांना उमेदवारी न देता घेतल्याचेही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

हम कबड्डी के खिलाडी हैं, शतरंज के नहीं

राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज भरुन बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी राज्यसभेची उमेदवारी आणि समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात न मिळालेले स्थान यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तुमच्यावर अन्याय झाला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर, ते म्हणाले की, ‘अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नही तो कल , कल नही तो परसो, असे आमचे धोरण आहे. ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हूँ’, अशी सूचक टिप्पणी केली आहे. त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना नक्की काय न्याय मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  पटेल यांनी जरी पक्षात विसंवाद न वाढू देता, आपल्या जवळच्या व्यक्तीला महत्त्वाच्या पदावर बसवल्याची किमया केली असली तरी, ‘राष्ट्रवादी’च्या अंतर्गत सुरू असलेल्या राजकारणात प्रफुल्ल पटेल हे केवळ पक्षात नाहीत, तर ते पक्षाच्या निर्णयांचे ड्रायव्हर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

follow us