रोजगार मागितला तर धोंड्याला मिरची लागली; रोहिणी खडसेंचा अप्रत्यक्ष टोला, शिंदे-खडसे संघर्ष पुन्हा पेटला

विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता अधिकच तीव्र झाले आहेत.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (46)

Rohini Khadse criticizes Ram Shinde : अधिक मासातील धोंडे जेवणाचा महिना संपला असला तरी या परंपरेवरून राज्याच्या राजकारणात सुरू झालेला वाद मात्र अद्याप थांबलेला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये धोंडे जेवणाच्या कार्यक्र्मावरून जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आता अधिकच तीव्र झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात धोंडे जेवणाचा मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर देखील मोठी चर्चा झाली. अनेक जावयांना आणि सासरच्या मंडळींनी या कार्यक्रमाचे व्हिडिओ शेअर केले. मात्र या आयोजनावर रोहिणी खडसे यांनी टीका करत, धोंडे जेवणाऐवजी बेरोजगार तरुणांसाठी मेळावे आयोजित करा, असा सल्ला दिला होता.

या टीकेला उत्तर देताना राम शिंदे यांनी रोहिणी खडसेंवर निशाणा साधला होता. रेव्ह पार्टी करणाऱ्यांना धोंडे जेवणाचं महत्व काय समजणार ? असा टोला त्यांनी लगावला होता. त्यानंतर आता रोहिणी खडसे यांनी देखिव सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्ही रोजगाराचा प्रश्न उपस्थित केला, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका धोंड्याला फार मिरची लागली. त्यानंतर हिंदू संस्कृती जपण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. मात्र हिंदुत्वाच्या नावाखाली दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही गुंडांना मदत केल्याचा गंभीर आरोप करत निलेश घायवळ आणि युवराज काशीद यांच्यासारख्या व्यक्तींचा उल्लेख देखील त्यांनी केला.

याचबरोबर, माझ्याकडे बरीच माहिती आहे. जर मी यांची कुंडली उघड केली, तर त्यांना राजकारणाला रामराम करावा लागेल, असा इशारा देखील रोहिणी खडसे यांनी दिला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईचा मोठा परिणाम; धास्तीपोटी ग्रामीण भागात सुट्या खाद्यतेलाची विक्री जवळपास बंद

दरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगाव चौंडी येथे राम शिंदे यांनी गावातील मुली आणि जावयांसाठी आयोजित केलेल्या धोंडे जेवणाच्या कार्यक्रमापासून सुरू झालेला हा वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. रोजगाराचा मुद्दा, हिंदुत्वाचा प्रश्न आणि वैयक्तिक आरोप यामुळे हा संघर्ष अधिकच रंगताना दिसत असून, पुढील काळात या वादावर कोणते नवे राजकीय पडसाद उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us