अजित दादांची जागा घेण्यासाठी त्यांना संपवल, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताविषयी अनेक घटना नव्याने सांगितल्या आहेत. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांच्या अपघातानंतर 2 महिने झाली तरी तपास (Ajit Pawar) अधिकाऱ्यांकडं स्मरणपत्र दिलेलं नाही, सीआयडीकडं काय चाललयं हे माहित नाही. राज्यात आम्ही विविध ठिकाणी जाऊन गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेही झालं नाही, पण कर्नाटकमध्ये आम्ही जाऊन आलो. कर्नाटकमध्ये आम्ही प्रयत्न केले ते सरकार दादांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावले असून त्यांनी झिरो एफआयआर करुन डिजींकडे पाठवला, असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली. जे आम्हाला जमलं ते आम्ही केलं, पाठपुरावा केला. त्यामुळे, कर्नाटकात झिरो एफआयआरने गुन्हा नोंद झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं. तसंच, अजित दादा जिवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आली, पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, असा गौप्यस्फोटच रोहित पवारांनी केलाय.
आम्ही राहुल गांधींना भेटलो, ते म्हणाले ज्या राज्यात न्याय मिळू शकतो अशा राज्यांत जावा, गवई साहेबाचे उदाहरण आहे. कर्नाटकात दादांच्या अपघातानंतर गुन्हा दाखल झाला, मी त्या राज्याचे आभार मानतो. मी फक्त कर्नाटकात गेलो, तिथे एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो राज्याकडं पाठवला. मी मरीनड्राईव्ह येथे गेलो तिथे एफआयआर घेतला नाही, मग मी बारामतीला गेलो, सीआयडीकडेही गेलो. मी कोर्टात गेलो असतो, हा गुन्हा नोंदवण्यासाठी खूप काही करावं लागतं. मात्र त्यांच्याच पार्टीतले नेते कसे राजकारण करत आहे हे मी उद्या इथे सांगेन असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनाही लक्ष्य केलं आहे.
नाशिक प्रकरणात एसआयटी करतात, चुकीच्या व्यक्तीला अटक करतात, जलद कारवाई होते. मग दादांच्या प्रकरणात का होत नाही. दादांच्या पक्षातील नेतेही काही बोलत नाही हे दुर्दैव आहे. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचाच दबाव म्हणून जय पवार यांची पत्रकार परिषद झाली नाही, असा गौप्यस्फोटही रोहित पवार यांनी केला आहे. प्रफुल पटेल यांना याचा तपास व्हावा असं वाटत नाही, तो ब्लॅकबॉक्स कुठंही अमेरिकेला गेलेला नाही. एव्हीएशनमधील अनेक अधिकारी त्यांचे परिचयाचे, जवळचे आहेत. एआयव्हीला एकच सांगायचं आहे, 9 अहवाल असताना एकही बाहेर आणला नाही. महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तर, अजित पवारांच्या मृत्यूबाबत काही गौप्यस्फोटही त्यांनी केले आहेत.
VSR कंपनी, लग्न समारंभ आणि अजित पवारांचा अपघात… रोहित पवार यांनी उलगडले नवे धागेदोरे
अजित पवार जिवंत होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर ब्लॅकमॅजिक झालेले पाहिलं, मुंबईच्या घराबाहेरही झालं. दादांच्या पक्षातील अनेक नेत्यांची करंगळी कापली, दादांची ताकद जावी आणि आपल्याला मिळावी हा हेतू कोणाचा होता हे तपासणं गरजेचं आहे, असं म्हणत रोहित पवारांनी अशोक खरात प्रकरणाकडंही लक्ष वेधलं आहे. अजित दादांचं ते पद मिळवण्यासाठी कोणी कोणी ब्लॅकमॅजिक केलं हे पाहणं महत्वाचं आहे. दादा असताना ते पद मिळणार नाही म्हणून ही काळी जादू केली असा गंभीर आरोपच रोहित पवार यांनी केला. सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, या केसमध्ये जी व्यक्ती अडकली जात आहे, कार्यकर्त्यांची इच्छा नसताना तटकरे कोणाची वर्णी लावत आहेत. इथे फक्त हवेत गोळीबार चालला आहे, दोन महिने आम्ही हाच विषय घेऊन होतो, इतर कुठलाही विषय आम्ही घेतला नाही.
उद्यापासून राजकीय प्रश्न मी घेईन, दादांच्या पक्षातील काही कागदं आमच्या हाती लागली आहे, अनेक गौप्यस्फोट आम्ही करू. भाजपला वाटतयं अजित पवार यांचा पक्ष संपला आहे. दादांच्या आमदारांना तिथे राजीनामा देऊन भाजपकडून त्यांना उभं करायचं हा विचार आहे. त्यामुळे फोकस आता एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडं वळवला आहे, असा गौप्यस्फोटच रोहित पवार यांनी केला. मंत्र्यांचे प्रश्न सुटणार नसतील तर सामान्यांचे प्रश्न कसे सुटणार, असा सवालही रोहित पवार यांनी विचारला आहे.
अजितदादांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रात FIR दाखल होऊन त्यांना न्याय मिळू शकला नसला तरी काल 23 मार्च रोजी कर्नाटकमधील पोलीस ठाण्यात झिरो नंबरने FIR दाखल करुन तो महाराष्ट्र पोलिसांकडं वर्ग करण्यात आला. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार. आता महाराष्ट्र पोलिसांची जबाबदारी वाढली असून या FIR चा तपास कशा पद्धतीने होतो याकडं आम्ही बारकाईने लक्ष ठेवू असंगी रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच, हा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनेच झाला पाहिजे आणि अजितदादांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या मग भले ती कितीही मोठी शक्ती असली तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी शेवटपर्यंत लढू आणि जिंकू असा निर्धारही रोहित पवार यांनी व्यक्त केला.