पवारांनी फोडला भाजपचा मोहरा; अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराविरोधात ‘कडेकोट’ मोर्चेबांधणी

पवारांनी फोडला भाजपचा मोहरा; अजितदादांच्या आणखी एका शिलेदाराविरोधात ‘कडेकोट’ मोर्चेबांधणी

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी भाजप (BJP), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजितदादांना (Ajit Pawar) पाणी पाजले. त्यानंतर “मला सोडून गेलेल्या किमान 80 टक्के आमदारांना तरी घरी बसवणार, अशी भीष्म प्रतिज्ञा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा मनसुबा बोलून दाखवला होता. पण ते फक्त बोलून शांत बसलेले नाहीत. तर या प्रतिज्ञेप्रमाणे चालीही आखत आहेत. त्यानुसार यापूर्वी पक्ष सोडून गेलेले माजी आमदार, भाजपचे माजी आमदार, भाजपमध्ये डावलण्यात आलेल्या नेत्यांना संपर्क करत आहेत. (Sharad Pawar has decided to take former BJP MLA Sudhakar Bhalerao to NCP (Sharad Chandra Pawar).)

शिवाय राष्ट्रवादीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनाही ताकद देण्याचे धोरण आखले आहे. याच धोरणात त्यांनी यापूर्वी अमळनेरमध्ये बी. एस. पाटील, शहापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा-गोंदियाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांना पुन्हा पक्षात आणले आहे. प्रशांत यादव यांच्या रुपाने आमदार शेखर निकम यांनाही पर्याय शोधला. आता पवार यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मंत्री संजय बनसोडे यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी एक मोठा मोहरा गळाला लावल्याचे बोलले जाते.

सुधाकर भालेराव नेमके कोण आहेत? आणि ते बनसोडे यांना कसे आव्हान देऊ शकतात तेच आपण पाहू.

सुधाकर भालेराव हे उदगीर राखीव मतदार संघातून भाजपचे सलग दोन वेळा आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना डावलले. परभणी येथील डॉक्टर अनिल कांबळे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे विजयी झाले. आता बनसोडे यांनी अजितदादा गटात प्रवेश केला असून सध्या ते क्रीडामंत्री आहेत. विधानसभा निवडणुकीतही भाजपची अजितदादा गटासोबत युती असल्यामुळे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, हे निश्चित आहे.

या समीकरणांमुळे विधानसभेसाठी भाजपकडून आपल्याला संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले. महाविकास आघाडीत उदगीरची जागा राष्ट्रवादीकडे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत उदगीरमध्ये राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आणि शरद पवार गटाचे सुधाकर भालेराव यांच्यात चांगलाच संघर्ष होईल अशी चिन्हे आहेत.

“दशक्रियेला बोलवा, कावळ्याआधी मी हजर”; पराभवानंतर सुजय विखेंचा ट्रॅक बदलला

खरंतर उदगीर हा एकेकाळचा भाजपचा बालेकिल्ला. गोपीनाथ मुंडे खासदार आणि पंकजा मुंडे व सुधाकर भालेराव हे दोघे आमदार अशी मराठवाड्यात भाजपची भक्कम स्थिती होती. गेल्या काही वर्षापासून सुधाकर भालेराव पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे हैराण होते. पालकमंत्री म्हणून संभाजी पाटील निलंगेकर काम करत असताना भाजपमध्ये निर्माण झालेल्या गटातटाच्या राजकारणावर भालेराव प्रकाश टाकत. आमदार अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातील वादाचे परिणाम जिल्ह्यातील संघटनेवर पडत होते. त्यामुळे हा बालेकिल्ला भाजपने स्वत:हून उद्ध्वस्त करून टाकल्याचे इतिसातून दिसून येते.

विधानसभेला कमी जागा घेण्यास तयार, पण उपमुख्यमंत्री पद अन्…; अजितदादांनी महायुतीपुढे ठेवली अट

यातूनच गेल्या काही महिन्यापासून सुधाकार भालेराव कोणत्या पक्षात जावे याचा शोध घेत होते. मध्यंतरी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती. अखेरीस त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उदगीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटातच विधानसभा निवडणुकीत सामना होईल आणि कमळ दिसणारच नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. तुम्हाला काय वाटते पवारांच्या या निर्णयाचा उदगीरमध्ये फायदा होईल का? शरद पवार बनसोडे यांना पाडू शकतील का? हे आम्हाला नक्की सांगा.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज