मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे नाही तर माझं नाव द्या; नरेश म्हस्केंचा संजय राऊतांबद्दल सनसनाटी दावा
ठाकरे गटाला जिवंतपणा आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रत्येक वार झेलणारा शिलेदार म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे.
शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात शिंदे गटाकडून सातत्याने राजकीय आरोप सुरुयेत. ठाण्याचे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपांमुळं या संघर्षाला नवं वळण मिळालय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत, यासाठी पवईतील हॉटेलमध्ये आमदारांची बैठक घेण्यात झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंऐवजी आपलं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढं करावं, असा आग्रह संजय राऊतांनी धरल्याचा सनसनाटी दावा म्हस्के यांनी केलाय. या दाव्याने खळबळ उडाली आहे.
त्याचबरोबर म्हस्के यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याविषयी राऊत यांनी अपशब्द वापरल्याचाही दावा केलाय. सध्या शिवसेना ठाकरे गटाची परिस्थिती पाहता ठाकरे गटाला जिवंतपणा आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील प्रत्येक वार झेलणारा शिलेदार म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे. परंतु, त्यांच्या बाबतीतच आता असा वादळी दावा केला असल्याने राजकीय उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर सर्वात विश्वासातील नेत्याने पडद्यामागं ठाकरेंविरोधात भूमिका घेतल्याचाही संदेश गेला आहे. दरम्यान, शिंदे गटाचा संघर्ष आता केवळ ‘उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे’ एवढ्यावर न ठेवता, ‘उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबतचे पक्षाच्या पडझडीला कारणीभूत होते अशी राजकीय मांडणीकडं वळला आहे.
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणी; ठाकरेंना मिळणार सर्वोच्च दिलासा? Live
त्याचबरोबर म्हस्के यांनी राऊतांच्या पत्राच्या आरोपावरूनही पलटवार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आपण केलेल्या तक्रारीचं एक तरी पत्र राऊतांनी दाखवावं, अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि जर पत्र दाखवलं तर आपण राजीनामा देऊ अस आव्हान देऊन पुन्हा राऊतांच्या कोर्टात चेंडू फेकला आहे. अशा अव्हानाला आता राऊत काय प्रतिक्रिया देतात हे महत्वाचं ठरणार आङे. शिवसेनेतील बंडाचे समर्थन करताना शिंदे गटाकडून पक्षांतर्गत अन्याय, निर्णयप्रक्रियेतील नाराजी आणि नेतृत्वाशी वाढलेले मतभेद हे मुद्दे मांडले गेले होते. त्याच काळात राऊत यांची भूमिका काय होती आणि त्यांनी शिंदे यांच्याविरोधात नेमके कोणते आरोप केले होते, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न म्हस्के यांनी केला आहे.
राऊतांना पक्ष ताब्यात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता, तसंच उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचं खूळ राऊत यांनीच घातलं, असं देखील म्हस्के म्हणालेत. हे आरोप केवळ राऊतांच्या व्यक्तिमत्त्वावर हल्ला करणारे नसून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित करणारे आहेत. परंतु, मस्के यांच्या या दाव्यांना ठोस पुरावे नसल्याने त्याची फक्त चर्चा सध्या सुरू झाली आहे. पण मस्के म्हणाले राऊत यांनी असल्या काहीही गप्पा मारू नयेत. आमची मूठ झाकलेली आहे तर झाकलेलीच ठेवावी. त्यांच्या या मतामुळं नक्की त्यांच्या मुठीत राऊतांचं आणि शिवसेनेच काय काय आहे अशीही चर्चा आता सुरू झाली आहे.