‘ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचा छोटा शकिल, राजीनामा द्यावाच लागेल’; संजय राऊतांचे गंभीर आरोप
Sanjay Raut on Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवरून संजय राऊत यांनी कुमारांवर गंभीर आरोप केलेत.
Sanjay Raut on Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार (Gyanesh Kumar) यांच्या कार्यपद्धतीवरून सध्या राजकीय वाद निर्माण झाला आहे. मतदार यादीच्या SIR प्रक्रियेसह काही निर्णयांवर निवडणूक आयोगातील इतर दोन आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत 14 वेळा आक्षेप घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने अंतर्गत मतभेद असल्याचे वृत्त फेटाळून लावत SIR सह सर्व निर्णय एकमताने घेतल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाने महाराष्ट्रातील निवडणुकीत अपहार केल्याचा आरोप राऊत यांनी केला. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असल्याचेही त्यांनी म्हटले.
“ज्ञानेश कुमारसारखी माणसं देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत. या ज्ञानेश कुमारचे बॉस अमित शहा आहेत. देशाचा निवडणूक आयोग अमित शहांच्या अंतर्गत काम करतो. अशा तऱ्हेने माफिया रॅकेट निवडणुकीत चालवले जाते. निवडणूक आयोग आता लोकशाहीचा कत्तलखाना झाला आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
ज्ञानेश कुमारांना अटक करा आणि निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करताना राऊत यांनी त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. “ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले माफिया आहेत. ते केंद्रीय गृहमंत्र्यांचे छोटे शकिल आहेत. ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल,” असेही राऊत म्हणाले.
या वक्तव्यामागे निवडणूक आयोगातील कथित मतभेदांची पार्श्वभूमी आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या काही निर्णयांवर 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचा दावा करण्यात आला. हे आक्षेप मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे वगळणे, Form 6 मधील बदल आणि निवडणूक आयोगाच्या डिजिटल यंत्रणेशी संबंधित निर्णयांवर असल्याचे वृत्त आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर काँग्रेसचा गंभीर आरोप, ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी
या वृत्तानंतर विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनीही या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने आयोगातील तीनही सदस्यांमध्ये कोणताही निर्णयात्मक मतभेद असल्याचे वृत्त फेटाळले आहे. SIRसह आयोगाचे सर्व निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने एकमताने घेतले जात असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे निवडणूक आयोगातील कथित मतभेदांबाबत राऊत आणि विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तसेच आयोगाची भूमिका, अशी दोन्ही बाजू या प्रकरणात समोर आली आहे.