चंद्रपूर जिल्हा मी नाही ‘ते’ चालवतात! सुधीर मुनगंटीवारांचे थेट भाजप प्रमुखांकडं अंगुलीनिर्देष

सबंधित विषयात काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं असं मुनगंटीवार म्हणाले.

News Photo   2026 07 04T143516.947

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Mungantiwar) आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील हा राजकीय संघर्ष आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे. चंद्रपुरातील अनेक मुद्यांवरुन दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. काही महिन्यांपूर्वी मुनगंटीवार आणि जोरगेवार वादावर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा हतबलता प्रगट केली होती.

काल महापालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यावरूनही दोन्ही नेत्यांच्या समर्थक नगरसेवकांमधील वाद समोर आला. शाब्दीक बाचाबाची झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील या अंतर्गत वादावर सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता, ‘मला माहित नाही. कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत असं त्यांनी उत्तर दिलं. यावर काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं असं मुनगंटीवार म्हणाले.

फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन, माझे शब्द लिहून ठेवा

या जिल्ह्याच्या प्रश्नांबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही. रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत, तर तुम्हाला अधिक जास्तची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका. तुम्हाला बातमी पाहिजे का? पण मी सांगितलं मी बोलणार नाही, मी आता प्रतिज्ञा घेतली आहे. तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतो आहे, तुम्ही त्या बुक डेपोमध्ये जा आणि माहिती घ्या असं उपरोधिक मुनगंटीवार बोलले आहेत.

रवींद्र चव्हाण संघटना चालवत आहेत ते जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. मी संघटनेवर लक्ष घालणार नाही पण लोकांच्या प्रश्नावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगारांच्या संदर्भात, पिण्याचं पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडणार आहे. कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे, पक्षाने तिकीट दिलं आहे. जनतेने निवडून दिलं आहे असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडणार. माननीय अध्यक्ष म्हणून चंद्रपूरच्या संघटनेचा त्यांनी ‘कल्याण’ करण्याचा निर्णय घेतला असेल तर वाट पाहिली पाहिजे आपण. त्यांनी निर्णय केला. त्यांनी निर्णय केल्यावर पुढचं सर्व काही ते पाहतील. ‘कल्याण’ शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्या, कल्याण या शब्दात दोन्ही आहे, त्यांच्यावर आम्ही पूर्ण जबाबदारी दिली आहे’ असं सुधीर मुनगंटीवार यांनी बोलून दाखवलं

follow us