महाराष्ट्रापेक्षा सुनील प्रभू यांच्यावर जास्त कर्ज? प्रभूंचा दाखला देत फडणवीसांचा विरोधकांना सवाल
महाराष्ट्रावर सध्या सुमारे 18 टक्के कर्ज आहे. प्रभू यांच्या तुलनेत राज्याची आर्थिक स्थिती अधिक चांगली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Sunil Prabhu has more debt than Maharashtra? : राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेला आज विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी राज्यावरील कर्जाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या शिवसेना (उबाठा) आमदार सुनील प्रभू यांच्या भाषणाला देखील उत्तर दिले. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सुनील प्रभू यांनी राज्यावर वाढलेल्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांनी प्रभू यांच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केला आहे. त्या परतिज्ञापत्रानुसार प्रभू यांची एकूण संपत्ती सुमारे 14 कोटी रुपये असून त्यांच्यावर सुमारे 3.54 लाख रुपयांचे कर्ज असल्याची नोंद आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्या संपत्तीच्या तुलनेत हे कर्ज सुमारे 25.28 टक्के दायित्व ठरते. एवढ्या दायित्वामुळे तुम्ही कर्जबाजारी होणार का? तुम्हाला नादारी घोषित करावी लागेल का? हे शक्य नाही. त्याचप्रमाणे राज्यावरील कर्जाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रावर सध्या सुमारे 18 टक्के कर्ज आहे. त्यामुळे प्रभू यांच्या उदाहरणाच्या तुलनेत राज्याची आर्थिक स्थिती अधिक चांगली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युद्धाच्या छायेतही गॅस पुरवठा सुरळीत; गॅस सिलिंडर पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीवर देखील प्रकाश टाकला. की, महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असते तर जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये त्याचा सुमारे 30 वा क्रमांक लागला असता. पहिल्या 35 देशांच्या अर्थव्यवस्थांशी तुलना केल्यास महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपाइन्स, नॉर्वे, व्हिएतनाम आणि बांगलादेश या देशांपेक्षा मोठी असल्याचा दावा त्यांनी केला. पुढील दोन ते तीन वर्षांत सध्याचा विकासदर कायम राहिला तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था युएई आणि सिंगापूर यांच्या देखील पुढे जाऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याच्या सकाळ राज्य उत्पन्नाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, 2013-14 मध्ये महाराष्ट्राचा जीएसडीपी सुमारे 16 लाख कोटी रुपये होता. गेल्या दहा वर्षांत तो वाढून 51 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून राज्याच्या अर्थव्यवस्थेत तीनपट वाढ झाली आहे. दरडोई उत्पन्नाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राज्याचे दरडोई उत्पन्न 3 लाख 17 हजार 803 रुपयांवरून 3 लाख 47 हजार 903 रुपयांपर्यंत वाढले आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या देशात पाचव्या क्रमांकावर असला, तरी राज्याचे क्षेत्रफळ आणि मोठी लोकसंख्या लक्षात घेतल्यास हा विकासदर समाधानकारक असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रापेक्षा सुनील प्रभू यांच्यावर जास्त कर्ज? प्रभूंचा दाखला देत फडणवीसांचा विरोधकांना सवाल.
