तलाठी भरती आता MPSC मार्फत, राज्य शासनाचा सरळसेवा भरती प्रक्रियेत मोठा बदल
राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे.
Talathi Recruitment Now Through MPSC : राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लावण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील विविध विभागांमध्ये ही भरती होणार असून, एकूण 33 विभागांतील 110 आस्थापनांमध्ये सुमारे 3600 हुन अधिक संवर्गांचा यात समावेश आहे. या सरळसेवा भरतीसाठी तब्बल 1400 पेक्षा अधिक सेवाप्रवेश नियम लागू असून, त्यानुसार प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे ही भरती केवळ मोठ्या प्रमाणावरच नाही, तर प्रशासकीयदृष्ट्या देखील व्यापक स्वरूपाची ठरणार आहे.
पूर्वी विविध विभागांकडून स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जात होत्या. या परीक्षा खासगी कंपन्यांमार्फत घेतल्या जात असल्यामुळे गैरप्रकार, पेपरफुटी, तांत्रिक अडचणी आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत होते. अनेक उमेदवारांनी आणि विविध संघटनांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेत, सरळसेवा भरती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे सोपवण्याची मागणी सातत्याने केली होती. अखेर राज्य सरकारने ही मागणी मान्य करत महत्वाचा निर्णय घेतला आणि सरळसेवा भरती एमपीएससीकडे वर्ग केली.
या बदलामुळे आता परीक्षा पद्धतीत मोठा बदल अपेक्षित आहे. केंद्रीकृत आणि अधिक शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षा घेतली जाईल, ज्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकारांना आला बसेल. तसेच, वेगवेगळ्या विभागांसाठी स्वतंत्र परीक्षा देण्याची गरज कमी होईल, त्यामुळे उमेदवारांचा वेळ, खर्च आणि ताण देखील कमी होणार आहे. एकाच छत्राखाली पेक्षा होणार असल्यामुळे स्पर्धा मात्र अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रात मोठी उलथापालथ, अहिल्यानगरसह 13 जिल्हा सहकारी बँकांवर प्रशासक
दरम्यान महसूल विभागाने 1700 पेक्षा जास्त तलाठी पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी हे ग्रामीण प्रशासनातील अत्यंत महत्वाचे पद मानले जाते. जमीन नोंदी, महसूल वसुली, शेतकऱ्यांशी संबंधित विविध कामे आणि सरकारी योजनांची अंमलबजावणी यामध्ये तलाठ्यांची भूमिका केंद्रस्थानी असते. त्यामुळे या पदासाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज करतात.
सध्या प्रत्येक जिल्ह्याकडून रिक्त पदांची माहिती मागवली जात असून, जिल्हानिहाय रिक्त जागांचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रियेची अधिकृत अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्ज प्रक्रिया, परीक्षा वेळापत्रक आणि इतर तपशील जाहीर केले जातील.राज्य सरकारने जाहीर केलेल्या मेगाभरती मोहिमेत या तलाठी भरतीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर सरकारी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, एमपीएससीमार्फत होणारी तलाठी भरती प्रक्रिया केवळ नोकरीची संधी नसून, स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवणारा एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. त्यामुळे या प्रक्रियेची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे राज्यातील सर्वच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांचे लक्ष लागले आहे.