माणुसकीला काळिमा फासणारी घटना; १९ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, एका विहिरीत धड सापडलं

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; १९ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, एका विहिरीत धड सापडलं

Body of Young Man found in Shirur and Shrigonda : शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवर माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे दाणेवाडी गावात १९ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह हातपाय कापलेल्या अवस्थेत आढळला होता. गेल्या चार दिवसांपासून त्याचं शिर आणि बाकीचे अवयव शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं. (Shirur) आज अखेर त्या परिसरात असलेल्या दुसऱ्या विहिरीमध्ये एका कपड्यात गुंडाळलेल्या अवस्थेत त्या मृतदेहाचं शिर आणि हात, पाय आढळले आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

माऊली सतीश गव्हाणे (वय १९) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. माऊली हा ७ मार्चला शिरूर येथे बारावीचा पेपर देण्यासाठी आला होता. मात्र त्यानंतर तो गायब झाला होता. कानात असलेल्या बाळीवरून माऊलीच्या आईने मृतदेह ओळखला. त्यांनी मृतदेह पाहताच एकच टाहो फोडला. एवढा काय गुन्हा केला की एवढ्या निर्दयीपणे आमच्या बाळाला मारलं, असा सवाल करत कुटुंबानं आक्रोश केला.

घरकुलधारकांसाठी आनंदाची बातमी! आता राज्य सरकार देणार पाच ब्रास मोफत वाळू, काय आहे नियम?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ७ मार्चला माऊलीचा बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी तो दाणेवाडी येथून शिरूर येथे आला होता. मात्र त्यांतर तो गायब झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत हातपाय आणि मुंडकं नसलेला मृतदेह सापडला होता. त्यामुळे हा मृतदेह नक्की कुणाचा याबाबत गूढ वाढलं होतं. दाणेवाडी गावकऱ्यांनी शिरूर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.

अखेर आज सकाळी बाजूला असलेल्या विहिरीमध्ये पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एक गाठोडं सापडलं. त्या गाठोड्यात काही दगडदेखील आढळून आले. मात्र त्याची तपासणी केली असता त्यात दोन हात, पाय, व शिर (डोकं) सापडलं. कुटुंबियांना याची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आलं. कानातल्या बाळीवरून तो मृतदेह माऊलीचा असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं.

पोलीस या घटनेचा तपास करत असून धक्कादायक घटनेने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षांच्या मुलाची एवढ्या निर्घृणपणे हत्या केली जाते हे अतिशय धक्कादायक असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिसांनी लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी दानेवाडी ग्रामस्थ व मृत माऊली गव्हाणे याच्या कुटुंबाने केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube