मोठी बातमी! हायकोर्टाच्या लिपिक भरतीत ट्विस्ट; 16 ऑगस्टची परीक्षा अचानक रद्द

छत्रपती संभाजीनगरसह कल्याण, वाशिम, हिंगोली आदी ठिकाणी उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं होतं.

News Photo   2026 08 29T214555.022

मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक (Paper) पदासाठी 16 ऑगस्ट रोजी राज्यभर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेली टंकलेखन चाचणी अखेर रद्द करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर आलेल्या तांत्रिक अडचणींमुळं अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नव्हती. सर्व्हर डाऊन होणं, संगणक आणि कीबोर्डमध्ये बिघाड यांसह विविध समस्यांचा सामना उमेदवारांना करावा लागला होता. त्यामुळं छत्रपती संभाजीनगरसह कल्याण, वाशिम, हिंगोली आदी ठिकाणी उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केलं होतं.

परीक्षेतील गोंधळानंतर उमेदवारांनी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. या प्रकरणी सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी उमेदवारांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे ठिय्या आंदोलन करत पाठपुरावा केला होता. तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत परीक्षा रद्द करून नव्याने चाचणी घेण्याची मागणी केली होती.

बॉम्बे हायकोर्ट लिपीक परीक्षा गोंधळात; हेच जंतर-मंतर म्हणत दीपके आंदोलनात

दरम्यान, रोहित पवार यांनी उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे आणि महाधिवक्ता मिलिंद साठे यांची भेट घेऊन परीक्षेतील तांत्रिक अडचणी आणि गोंधळाची माहिती दिली होती. त्यानंतर आता न्यायालय प्रशासनाने 16 ऑगस्ट रोजी झालेली ऑनलाइन टंकलेखन चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या परीक्षेची तारीख नंतर उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचे रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. मात्र, झालेल्या परीक्षेतील गैरप्रकार आणि तांत्रिक त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसंच नव्याने घेण्यात येणारी टंकलेखन चाचणी स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे नव्या परीक्षेच्या तारखेकडं राज्यभरातील उमेदवारांचं लक्ष लागलं आहे.

follow us