तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात; उद्धव आणि राज ठाकरेंनी संयुक्तरित्या जाहीर केला वचननामा
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तरित्या वचननामा जाहीर.
Uddhav and Raj Thackeray jointly announced the pledge : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तरित्या वचननामा जाहीर केला आहे. शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. विशेष बाब म्हणजे जवळपास वीस वर्षांनंतर राज ठाकरे(Raj Thackrey) शिवसेना भवनात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना(Shivsena) भवनाशी संबंधित जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे(Uddhav Thackrey) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरू असल्याचं वातावरण निर्माण झालं असल्याचं ते म्हणाले. आम्ही मतचोरी उघड केल्यानंतर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आजवर इतके निगरगट्ट राज्यकर्ते कधीच पाहिले नाहीत, असं म्हणत बिनविरोध निवडणुका घडवून आणण्याचा प्रयत्न हा चुकीचा असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
‘राहुल नार्वेकर यांचं तात्काळ निलंबन करा’
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केले. राहुल नार्वेकर आमदार म्हणून मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग करत असून अध्यक्ष पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याचं ते म्हणाले. अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाहीत. त्यांनी प्रचाराला जातीय छेद देणारं कृत्य केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि राहुल नार्वेकर यांना तात्काळ अध्यक्षपदावरून निलंबित करावं, अशी मागणी त्यांनी केली. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका लादल्या जात असून मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे. अन्यथा निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम असल्याचा संदेश जाईल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.
‘मोदींनी कैलास पर्वत बांधला का?’
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, वरळीत सगळे डोमकावळे जमले होते. आम्ही मुंबईत 25 वर्षांत कोस्टल रोड, मध्य वैतरणा धरणासारखी कामं केली. पण मोदींनी तर जणू कैलास पर्वतच बांधला आहे. गंगा स्वर्गातून आणली, अरबी समुद्र मिंध्यांनी तयार केला, असं का सांगत नाहीत? पाण्यातील शिवस्मारक कधी बाहेर काढणार आहेत? समुद्रमंथन करून ते स्मारक बाहेर काढावं, असा उपहासात्मक टोलाही त्यांनी लगावला. निवडणूक आयोगात दम असेल तर निर्णय प्रलंबित ठेवू नका, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिलं. कोरोनाकाळातील पुस्तकावर निवडणूक आयोगाने बंदी घातली असली तरी आम्ही ते पुस्तक वाटणारच आहोत. आम्हाला अडवण्याची हिंमत असेल तर दाखवावी, असं थेट आव्हान त्यांनी दिलं. भाजपचा महापौर झाला तर मुंबईचं ‘अदानीस्थान’ होईल, अशी टीकाही त्यांनी केली.
पात्रता नसताना निवडणूक लढवणं म्हणजे घराणेशाही; गिरीराज सावंत यांनी स्पष्टचं सांगितलं
‘उद्या तक्रार करू नका’ – राज ठाकरे
राज ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही येत नाही. उद्या सत्ता गेल्यानंतर जेव्हा दामदुपटीने सगळं सुरू होईल, तेव्हा त्याची तक्रार करू नका, असं ते म्हणाले. आपण कधीच सत्तेबाहेर जाणार नाही, हा भ्रम सत्ताधाऱ्यांनी दूर केला पाहिजे. चुकीचे पायंडे पाडले तर पुढे त्याचे परिणाम अधिक भयंकर होतील, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राचं यूपी-बिहारकरण केलं जात असल्याचा आरोप करत, राजकारणात येणाऱ्यांची विचारसरणी बदलणं आणि दहशतीचं वातावरण निर्माण करणं हे अत्यंत घातक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
‘आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही’
राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं की, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मुंबईत मराठीचा मान राखला जाईल आणि महापौर मराठीच असेल. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपला मराठी माणूस हिंदू वाटत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ravindra Chavan : पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का ; राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजपमध्ये प्रवेश
ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभा
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त प्रचार सभा 5 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क येथे तीन मोठ्या सभा होणार आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदरमध्ये ठाकरे बंधूंच्या प्रत्येकी एक सभा होणार आहे. मनसेचा पूर्वीचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्येही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होणार असून, संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची स्वतंत्र सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय दोघांच्या वेगवेगळ्या सभाही होणार आहेत.
स्टार प्रचारकांची यादी जाहीर
ठाकरे बंधूंच्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे राज्यभर प्रचार सभांचा धडाका उडवणार आहेत. यांच्यासोबत संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत आणि सुषमा अंधारे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
