वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली; रुग्णालयात न घेऊन जाता तुरुंगातच उपचार
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.

Walmik Karad Custody Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. शनिवारी रात्री त्याची प्रकृती अचानक बिघडली. (Karad) रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास जाणवायला लागल्यानं वैद्यकीय पथक तुरुंगात बोलावण्यात आलं. त्याची तुरुंगातच तपासणी करण्यात आली. पण रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचं वैद्यकीय पथकाने सांगितलं.
वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. मोक्काअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. याआधीही वाल्मिकने प्रकृती ठीक नसल्याचं कारण अनेकदा दिलं होतं. शनिवारी पुन्हा त्यानं प्रकृती बिघडल्याचं सांगितलं. रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होत होता अशी माहिती समोर येत आहे.
बीडमध्ये गुन्हेगारांची हिंमत कायम; तुझा संतोष देशमुख करू म्हणत तरुणावर केले कोयत्याने वार
प्रकृती बिघडल्याचं समजल्यानंतर तुरुंग प्रशासनानं याची माहिती वैद्यकीय पथकाला दिली. यानंतर वैद्यकीय पथकानं कारागृहातच वाल्मिकची तपासणी केली. त्यानंतर वाल्मिकला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचं वैद्यकीय पथकानं स्पष्ट केलं. तुरुंगातच त्याच्यावर उपचार करण्यात आले.
संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बीडमधील विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ३ जूनला झालेल्या सुनावणीवेळी वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज अर्जावर युक्तिवाद झाला. पण न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. यामुळे वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलांकडून डिस्चार्ज अर्ज दाखल करण्यात आलाय. या अर्जाला सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला. न्यायालयाने या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत महत्त्वाचा निर्णय दिला. सरकारी पक्ष आणि आरोपींचे वकील यांनी कोर्टात दाखल केलेल्या अर्जांवर एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे.