Amravati : थंड डोक्याने आई अन् लहान भावाला संपवले; काळजाचा थरकाप उडविणारे दुहेरी हत्याकांड
Crime : अमरावती : येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आई आणि लहान भावाची भूल देऊन हत्या केली आहे. सौरभ कापसे असे आरोपी मुलाचे नाव आहे तर नीलिमा कापसे आणि आयुष कापसे अशी मृतांची नावं आहेत. आरोपी मुलाने आधी भाजीमध्ये धोतरा मिसळून दोघांना खाऊ घातला. नंतर त्यांना अशक्त वाटू लागल्याने मुलाने एका कंपाऊंड मित्राच्या मदतीने सलाईन लावले. त्यात भूल देण्याचे औषध मिसळून दोघांचीही हत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे. (boy killed his mother and younger brother with anesthesia)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती येथील शिवाजीनगर भागात कापसे कुटुंब राहते. मागील काही दिवसांपासून त्यांच्या घरातून कोणीही आत-बाहेर येत जात नव्हते. मात्र दोन दिवसांपासून शेजाऱ्यांना घरातून दुर्गंध येऊ लागल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी बेडमधून रक्त येत होते. पोलिसांनी बेड उचलून बघितला असता त्यात दोन मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
शेजाऱ्यांच्या आणि नातेवाईकांच्या माहितीवरुन मृत नीलिमा यांचा मोठा मुलगा गायब असल्याची मिळाली. पोलिसांनी त्याची माहिती गोळा करून त्याला हैद्राबाद येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला. त्याने महिन्याभरापूर्वीच आई नीलिमा आणि लहान भाऊ आयुषची हत्या करून हैदराबादला पळ काढला होता. आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने आईच्या हत्येचा कट रचला. तर पोलिसांना याची माहिती मिळू नये यासाठी लहान भावाचीही हत्या केल्याचे त्याने चौकशीत सांगितले.
सोशल मीडिया आणि मित्रांकडून हत्येची माहिती गोळा करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस अधिकारी किरण वानखडे यांनी सांगितले की, आरोपीने आधी धोतरा भाजीत मिसळून आई आणि लहान भावाला खाऊ घातले. त्यामुळे दोघांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याने दोघांवरही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्याच्या कंपाउंडर मित्राला घरी बोलावून सलाईन लावले. या. सलाईनमध्ये भूल देण्याचे औषध टाकून त्याने अतिशय थंड डोक्याने दोघांची हत्या केली. आरोपी मुलगा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असून तो मोबाईलचे दुकानही चालवतो. त्यांचे अनेक मित्र वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत. त्याने त्यांच्याकडून माहिती गोळा केली. तसेच, यूट्यूब आणि गुगलवरून व्हिडीओ पाहून दोघांचीही हत्या केली.