Maratha Reservation : यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

  • Written By: Published:
Maratha Reservation : यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

यवतमाळ : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक झाला असून राज्यभरात आंदोलनं केली जात आहेत. राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारला जात आहे. राज्यातील परिस्थितीत चिघळत चालली आहे. यवतमाळमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मराठा आरक्षण आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

‘सरकारी काम, सहा महिने थांब…आम्ही मागे सारलं’; CM शिंदेंची जळजळीत टीका 

40 दिवसांची मुदत देऊनही मराठ्यांना आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ अनेक ठिकाणी साखळी उपोषण केले जात आहे. मराठा आंदोलक राजकीय नेत्यांना अडवून जाब विचारत आहेत. मराठा समाजाचा रोषाला अनेक राजकीय नेत्यांना सामोरं जावं लागत आहे. खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमातही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला.

यवतमाळमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ शिंदे रस्त्याने कार्यक्रमस्थळी येत होते. यावेळी मराठा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाल्यावर कार्यकर्त्यानी कार्यक्रमातच गोंधळ घालायला सुरूवात केली. मुख्यमंत्री हे मंचावर पोहोचताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये महिलांचाही समावेश होता. या महिलांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

मराठा आरक्षणसोबतच सोयाबीन आणि कापसाला दर मिळावा. पिक विमा, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी मुद्दांवरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

आंदोलकांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यामुळे मराठा संघटनांसह ठाकरे गटाचे कार्यकर्तेही या कार्यक्रमात आक्रमक झाले. या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांसह शिवसैनिकानांही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण न मिळाल्यानं अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेक ठिकाणी तोडफोड, रास्तारोको करण्यात येत असल्यानं राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. त्यामुळं सरकार आरक्षणविषयी कार्य निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube