Bacchu Kadu : CM शिंदेंचं एन्काउंटर.. बच्चू कडू म्हणाले, तथ्य असेल तर..

Bacchu Kadu : CM शिंदेंचं एन्काउंटर..  बच्चू कडू म्हणाले, तथ्य असेल तर..

Bacchu Kadu : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना नक्षलवाद्यांच्या हातून जीवे मारलं जाणार होतं, असं खळबळजनक विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलं. तसंच मी जबाबदारपणे हा गौप्यस्फोट करत आहे, असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणात आता शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भाष्य केले आहे. या वक्तव्यात तथ्य असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कडू यांनी केली.

कडू आज नागपूर शहरात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता कडू म्हणाले, संजय गायकवाड यांनी ही माहिती कशी मिळाली हे मला माहिती नाही. पण, त्या माहितीत तथ्य असेल तर ही फार मोठी दुर्दैवी गोष्ट आहे. अशा पद्धतीनं राजकारण व्हायला लागलं तर ते चुकीचं आहे. गायकवाड यांच्या माहितीत तथ्य असेल तर पोलीस यंत्रणेकडून तपास व्हायला हवा.

‘शरद पवारांना राजीनामा द्यायचाच नव्हता’; घटनाक्रम सांगत सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट

ही तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली होती यावर पत्रकारांनी कडूंना विचारले. त्यावर ते म्हणाले, कार्यकर्ता आणि नेता यांच्यात जीवाभावाचं नातं असतं. हे नातं कायम ठेवणं ही दोघांचीही जबाबदारी असते. पण, जर असं होत असेल तर ही घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे, अशा शब्दांत कडू यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेत त्यांच्यावर टीका केली.

नेमकं काय म्हणाले होते गायकवाड ?

एकनाथ शिंदे यांना दुसरे काही दिलं जाणार नव्हतं, तर त्यांना मृत्यू दिला जाणार होता. मृत्यू. नक्षलवाद्यांच्या हातून त्यांचं एन्काऊंटर केलं जाणार होतं. मुख्यमंत्र्यांना नक्षलींच्या ताब्यात देऊन हत्या घडवून आणण्याचं त्यांचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. मी अत्यंत जबाबदारीने हा खुलासा करत आहे, असं गायकवाड यांनी सांगितलं.

Nana Patole : दिल्ली अन् गुजरातवरून चालणारं हे आउटसोर्सिंग सरकार; नाना पटोलेंचा घणाघात

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. या धमकीनंतर राज्य सरकारने एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. ही सुरक्षा देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी बैठक सुरू होती. त्यावेळी मातोश्रीवरून फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असे सांगण्यात आले. याचा अर्थ काय? तुम्ही त्यांना मारण्यासाठी टपले होते. शिंदे राजकारणातून खतम होत नाहीत, म्हणून त्यांना नक्षलींच्या हातून मारायचं होतं. त्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंना सुरक्षा नाकारली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube