धक्कादायक : नागपुरात 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांच्या गँगचा पर्दाफाश; चविष्ट जेवणासाठी…

Nagpur News : नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सायकली चोरणाऱ्या मुलांच्या एका टोळीला बेलतरोडी पोलिसांनी (Beltarodi Police) ताब्यात घेतलं. त्या मुलांची कहाणी ऐकून पोलिसही आश्चर्यचकित झालेत. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील सर्वात मोठा सदस्य १२ वर्षांचा आहे, तर सर्वात धाकटा सदस्य सात वर्षांचा आहे.
स्वतःची भाकरी महाराष्ट्रातच भाजली! खासदार दुबेंचं मुंबई कनेक्शन, अलिशान घर अन् प्रतिष्ठेची नोकरी…
ही मुले हॉटेलमधील चमचमीत पदार्थ खाण्यासाठी सायकली चोरत होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 12 सायकली जप्त केल्या आहेत. बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या पोलिस ठाण्याच्या परिसरातील रहिवासी आशिष उमाटे यांनी त्यांच्या मुलासाठी सायकल खरेदी केली होती, नंतर ही सायकल चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी सायकल चोरीची पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, पोलिसांनी एका सात वर्षांच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली केली.
मुलाने चौकशीत सांगितले की, त्याचे तीन-चार मित्र एकाच शाळेत शिकतात. ही सर्व मुलं गरीब कुटुंबातील आहेत, काहींना पालक नाहीत, तर काही नातेवाईकांकडे शिकतात. ही मुले सायकली चोरून स्वस्त दरात विकत असत. ते वेगवेगळ्या कहाण्या सांगून लोकांना सायकली विकायचे. कधीकधी ते त्यांची आई आजारी असल्याचे कारणं सांगून सायकली विकायचे, तर कधीकधी त्यांचे आजोबा किंवा भाऊ रुग्णालयात दाखल आहे असे सांगून सायकली विकायचे. एकदा त्यांच्यापैकी एकाने अभ्यासाची पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगून पाचशे रुपयांना सायकल विकली होती, असं मुलाने चौकशीत सांगितलं.
आईचा प्रेरणादायक प्रवास दिसणार; सुपर डान्सरच्या यंदाच्या सीझनमध्ये होणार धमाका
मुलांना समुपदेशन केंद्रात पाठवले
दरम्यान, मुलांनी सांगितले की त्यांना अभ्यासात रस नाही. म्हणूनच ते अनेकदा शाळेतून पळून जायचे. इकडे-तिकडे फिरत-फिरत ते वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पोहोचायचे आणि तिथले जेवण पाहून त्यांना ते जेवण खाण्याची इच्छा व्हायची. मात्र, पैशाअभावी त्यांना हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा आस्वाद घेता येत नव्हता. परिणामी, ते चोरीच्या मार्गाला लागले. त्यांनी सायकली चोरायला सुरुवात केली होती. आता या मुलांना समुपदेशन केंद्रात पाठवण्यात आले आहे.