SIT करणार बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दापाश; मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
दोन दिवसांपूर्वी वर्धा येथील पोलिस अधीक्षक नुरुल हसन (Superintendent of Police Nurul Hasan) यांनी बनावट कापूस बियाणे (bogus cotton seed) विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करून १ कोटी ५१ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेने संपूर्ण राज्यातील यंत्रणा अलर्ट झाली. राज्यातील विविध जिल्ह्यात ठिकठिकाणी छापे मारून बोगस बियाणे जप्त करण्यात आले. मात्र, या रॅकेटची पाळेमुळे खोदण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी तत्काळ प्रभावाने एसआयटी’ म्हणजेच (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) गठीत केली आहे. वर्धा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरतील विविध जिल्ह्यात तपासकार्य सुरू करण्यात आले. (SIT will investigate the Wardha bogus seed case,)
मागील ३ वर्षांपासून वर्धा जिल्ह्यात बनावट कपाशी बियाणे विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू होता. मात्र, याची थोडी देखील भणक कृषी विभागाला नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. अखेर पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी वर्ध्यातील म्हसाळा परिसरात कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून सुरू असलेल्या बनावट कपाशी बियाणे विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून भंडाफोड केला. याप्रकारणी १० आरोपींची टोळी गजाआड केली. एसपी हसन यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. राज्यभरात विविध पथके तयार गठीत करून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या असून आता पुढील तपास एसआयटी करणार आहे.
कॉंग्रेसला विरोध करून गडकरींचा मोदी, शाहांना खूश करण्याचा प्रयत्न; कॉंग्रेस नेत्याची खोचक टीका
अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांची फौज सज्ज
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या नेतृत्वात एसआयटी गठित केली. चकाटे हे प्रमुख असून चार पोलिस उपनिरीक्षक आणि दहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास व्हावा, यासाठी एसआयटी’ त स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांच्यासह सेवाग्राम पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षकांचा देखील समावेश करण्यात आला.
बोगस बियाण्यांचा कारखानाच पोलिस अधीक्षक हसन यांनी उद्ध्वस्त केल्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिस अधीक्षक हसन यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांनी केलेल्या कारवाईबाबत त्यांचे कौतुक केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी एकूण १५ सदस्यांची नियुक्ती ‘एसआयटी मध्ये केली आहे. तपास करणाच्या एसआयटीच्या प्रमुखासह सदस्यांना प्रत्येक २४ तासांत केलेल्या तपासाची माहिती पोलिस अधीक्षकांना द्यावी लागणार आहे. प्रत्येक बारीक घडामोडीवर पोलिस अधीक्षक हसन स्वतः लक्ष ठेवून आहेत.
कृषी विभागातील मोठे मासे गळाला?
मागील ३ ते ४ वर्षांपासून सुरु असलेल्या बोगस बियाणे कारखान्याकडे कृषी विभागाचे लक्ष न जाणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. हे रॅकेट कृषी विभागा- तीलच काही अधिकाऱ्यांच्या मूक संमतीने सुरू होते, अशी चर्चा रंगू लागली आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशाची सीमा असे परराज्याचे कनेक्शन या प्रकरणाशी जुळले असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिस त्या दृष्टीने देखील तपास करीत असून या प्रकरणात बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.