Buldhana Accident : भीषण अपघात! बुलढाण्यात दोन बस समोरासमोर धडकल्या, 5 जणांचा जागीच मृत्यू
Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ट्रॅव्हल बस समोरासमोर धडकल्या. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहावर ही दुर्घटना घडली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघात भीषण असल्याने यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पटेलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांना वेगळाच संशय; म्हणाले, हा तर देवेंद्र फडणवीसांना…
याबाबत अधिक माहिती अशी, मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहावर दोन खासगी ट्रॅव्हल बस समोरासमोर येऊन धडकल्या. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना लक्ष्मीनगर उड्डाणपुलावर घडली. या अपघातातील एक बस अमरनाथ तीर्थयात्रा करून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी होते. तर दुसरी ट्रॅव्हल बस नाशिकच्या दिशेने जात होती. मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावर या दोन्ही बस समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बस अक्षरशः चिरडल्या गेल्या. या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत.
या अपघातात जखमी झालेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही जखमींना पोलीस वाहनातूनच दवाखान्यात घेऊन जाण्यात आले. दोन्ही बस समोरासमोर धडकल्याने हा अपघात भीषण असाच होता. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुलढाणा येथे याआधीही भीषण अपघात झाला होता. या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच या जिल्ह्यात हा दुसरा अपघात घडला आहे.