Winter Session : चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, ‘या’ मुद्द्यांवर सरकारला घेरणार, मविआच्या बैठकीत काय ठरलं?
नागपूर : सोमवारपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू होत आहे. मोठ्या संख्याबळासह पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या (BJP) आमदारांमध्ये उत्साह आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केलाय, अधिवेशन कालावधीही कमी आहे, आम्ही आनंदाने सरकारच्या चहापानासाठी जावे, अशी परिस्थिती नाही, त्यामुळं आम्ही सरकारकडून आयोजित चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, असं कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी स्पष्ट केलं.
नवा फॉर्मुला, मंत्रिपदाची संधी फक्त अडीच वर्षांसाठी, अजितदादा नेमकं काय म्हणाले?
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रामगिरीवर सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला. मात्र, ईव्हीएम बंदीची मागणी, शेतकऱ्यांचे प्रश्न, परभणी हिंसाचार, बीड सरपच हत्या, उद्योगांचे स्थलांतर आदी मुद्द्यांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. विरोधाची धार आणखी तीव्र करण्यासाठी विरोधक चहापानावर बहिष्कार टाकला. याबाबत बोलतांना वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकाल नंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन होत आहे. मात्र, वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग महायुती सरकारने केला आहे. अधिवेशन कालावधी कमी आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सोलापूरवर वरिष्ठांची मर्जी खप्पा! एकाही आमदाराचा फोन वाजला नाही; मंत्रिपदाची पुन्हा हुलकावणी
विदर्भातील प्रश्नांना हरताळ..
ते म्हणाले की, एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे, सोयाबीन, धान कापसाला हमीभाव मिळत नाही. विदर्भात खूप मोठे प्रश्न आहेत, पण त्याला या सरकारने हरताळ फासला आहे. त्यामुळेच शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. यानंतर आंबेडकरी जनतेने आंदोलनं केलं. पण त्यातही कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अनेक कार्यकर्त्याना मारहाण झाली, धरपकड करण्यात आली. त्यातही एक कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, हे संतापजनक आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महायुती सरकार ‘खुनी सरकार’
बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. ह्यातील आरोपीला राजकीय वरदहस्त आहे. खून करणाऱ्या आरोपीला राजकीय आश्रय देणारे आज मंत्री केले जाते, त्यामुळे या खुनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, महेश सावंत, ज. मो.अभ्यंकर हे उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेला महाविकास आघडीच्या नेत्यांनी संबोधन केले.