Video : सरकारला घरचा आहेत देत मुनगंटीवारांच्या अध्यक्षांना शुभेच्छा पण, हातवारे करत नार्वेकरांचा नकार

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्याने भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) नाराज असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. ते नाराज असल्याचे त्यांच्या विधानातून अनेकदा दिसूनही आले आहे. त्यात आज (दि.11) त्यांनी भरसभागृहात स्वतःच्या सरकारला घरचा आहेर देत सुनावले. पण चर्चा घरच्या आहेराची नव्हे तर, मुनगंटीवार यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) दिलेल्या शुभेच्छांची आणि त्याला नार्वेकरांनी हातवारे करत दिलेल्या नकाराची रंगली आहे. त्यामुळे विधानसभेत चर्चेवेळी नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया…
धंगेकर म्हणजे पुण्यातील कराड; हाती ‘धनुष्य’ पेलताच काँग्रेसच्या नेत्यानं उगारला ‘पंजा’
कर्मचारी भरतीवरून मुनगंटीवारांनी दिला घरचा आहेर
राज्याच्या विधीमंडळाच्या रिक्त कर्मचाऱ्यांचा मुद्दा सुधीर मुनगंटीवारांनी सभागृहात मांडला. ते म्हणाले की, एकीकडे विधीमंडळ चकाचक करत आहात, पण विधीमंडळातील कर्मचारी भरती होत नाही. त्यामुळे ही भरती कधी करणार? असा सवाल त्यांनी केला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर, पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी चकाचक विधानभवन काय कामाचं असा टोला लगावत मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिला.
हे म्हणजे लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाहीत
पुढे स्वतःच्याच सरकारचे कान उघडणी करताना मुनगंटीवार म्हणाले की, विधीमंडळाला कालच्या बजेटमध्ये 500 कोटींपेक्षा अधिक निधी देण्यात आला. त्यामुळे शिल्लक असलेल्या जागा कधी भरणार? मंत्रालयातील कर्मचाऱ्यांपेक्षा विधान भवनातील कर्मचारी अधिक काम करतात असे म्हणत रिक्त जागा कधी भरणार? असा सवाल त्यांनी केला. निधी आहे पण, कर्मचारी नाहीत. हे म्हणजे लग्नात जेवणाला पैसे आहेत पण मंगळसूत्र घ्यायला पैसे नाहीत अशी अवस्था व्हायला नको असे मिश्कील टोला लगावला.
….तर मुनगंटीवारांच्या शुभेच्छांना नार्वेकरांचा हातवारे करत नकार
विधीमंडळातील कर्मचारी भरतीवरून महायुती सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर मुनगंटीवारा यांनी त्यांचा मोर्च्या सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे वळवत म्हणाले की, विधीमंडळ कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला तर, तुम्ही आजन्म अध्यक्ष राहाल अशा शुभेच्छा मुनगंटीवार यांनी नार्वेकरांना दिल्या, त्यावर नार्वेकरांनी हातवारे करत नको नको असं म्हटले त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यामुळे सध्या मुनगंटीवरांच्या घरच्या आहेराची आणि नार्वेकरांच्या हातवारे करत नकाराची जोरदार चर्चा रंगली आहे.