Video : टकले पडळकरांचा मावस भाऊ तर, देशमुख…; आव्हाड-पडळकरांच्या राडा अहवालात काय काय?

Rahul Narvekar : काल विधीमंडळाच्या आवारात जोरदार राडा झाला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडले. अंगातील शर्ट फाटेपर्यंत मारामारी झाली. या घटनेने राज्यातील राजकारण आणि समाजमन अस्वस्थ झालं आहे. फक्त मारामारीपर्यंतच हा प्रकार थांबला नाही. तर गुरुवारी मध्यरात्रीनंतरही हा अटक नाट्यावरून चांगलाच राडा झाला. या घटनेचे पडसाद आज विधीमंडळात उमटले. या प्रकरणाचा अहवाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर करण्यात आला होता. या अहवालात नेमकं काय आहे याचा खुलासा नार्वेकर यांनी केला.
मारामारीची घटना अत्यंत गंभीर आहे. विधानसभेच्या आवारात घडली आहे. यानंतर मी विधानभवनाचे मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यानंतर अधिकाऱ्यांनी मला अहवाल सादर केला. त्यात असे दिसून येते की विधानसभेच्या आवारात अचानक दोन अभ्यागतांत हाणामारी झाली. सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत मारामारी थांबवली आणि या व्यक्तींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे चौकशी केली असता नितीन हिंदुराव देशमुखने मी आमदार जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. दुसरा व्यक्ती सर्जेराव बबन टकले याने मी आमदार गोपीचंद पडळकर यांचा मावसभाऊ असल्याचे सांगितले.
गुन्हा दाखल आता फौजदारी कारवाई
याबाबत संबंधितांविरुद्ध आणि त्यांच्या बरोबरील अन्य पाच ते सहा जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येत आहे.
या प्रकरणी कोणत्याही स्वरुपाची परवानगी नसताना तसेच अधिकृत प्रवेशिका नसताना हे लोक सदस्यांसोबत आवारात आले. त्यांनी मारामारी करुन अत्यंत आक्षेपार्ह कृत्य केले आहे असे दिसून येत आहे. आमदारांनी अशा लोकांना येथे आणण्याची काहीच गरज नाही असे मला वाटते. जर हे लोक सोबत आलेच तर त्यांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित सदस्यांनी घेणे आवश्यक आहे. या वर्तणुकीसाठी संबंधित सदस्यांवर देखील जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. आमदारांच्या आचरणाचे मानदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धरतीवर नीतीमूल्य समिती गठीत करण्याचे विचाराधीन आहे. याबाबतचा निर्णय पुढील एक आठवड्यात घेण्यात येईल असे नार्वेकर यांनी सांगितले.