मनोज जरांगेच्या सभेत घुसून केली चोरी, पोलिसांनी सराईत चोराला ठोकल्या बेड्या
अहमदनगर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेत दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमोल बाबासाहेब गिते (Amol Babasaheb Gite) (रा. खांडगाव, ता.पाथर्डी) असं या चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे.
Spruha Joshi : पांढरी साडी, हातात गजरा… पाहा स्पृहा जोशीचा नवा लूक
मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगे पाटील यांची साकुरी येथे 8 ऑक्टोबरला विराट सभा पार पडली होती. या सभेला किशोर दंडवते हे देखील आले होते. या सभेला प्रचंड गर्दी जमली होती. या सभेत गर्दीचा फायदा घेत चोराने फिर्यादी किशोर चांगदेव दंडवते यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली होती. तसेच सोन्याचे पेन्डलही लंपास केले. या चोराने एकूण १० लाख ९५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. याबाबत किशोर दंडवते यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला असता पोलिसांची अमोल बाबासाहेब गिते याच्याकडे संशयाची सुई गेली. पोलिस तपासात या कार्यक्रमाचे सिसिटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यात सराईत गुन्हेगार अमोल गिते याचा वावर आढळून आला. अमोल गिते याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केल्यनंतर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. नवीन माने (रा. भिंगार) व संदीप झिंजवडे (रा. पाथर्डी ) या दोघांचा आरोपींमध्ये समावेश असून आहे. अमोल गितेचे हे दोन्ही साथीदार सध्या पसार आहेत.
आरोपी अमोल गितेविरुद्ध पाथर्डी, शेवगाव, आळंदी, नातेपुते (जि. सोलापूर) या पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे 7 गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई. सोपान गोरे, पोहेकॉ. बापूसाहेब फोलाने, दत्तात्रय हिंगडे, दत्तात्रय गव्हाणे, पोना. रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, संतोष खैरे, संदीप चव्हाण, फुरकान शेख, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांच्या विशेष पथकाने केली.