शरद पवारांचे माढ्यात दोन धक्के; मोहिते पाटलांसह शिंदे गटाचा नेता हाती घेणार ‘तुतारी’
Sharad Pawar on Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातील लढतीचं चित्र आता स्पष्ट होत आहे. याचं कारण म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील आजच शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत मोहिते पाटील पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती स्वतः पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. शरद पवार यांनी आज अकलूजमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. याआधी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, फलटणचे रघुनाथराजे नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवावी अशी आमच्या सगळ्यांची इच्छा होती. आज संध्याकाळी जयंत पाटील येथे येतील आणि पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय होईल. याचबरोबर लोकसभेसाठी अर्ज भरण्याची तारीख 16 एप्रिल आहे. सोलापुरात दोन्ही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरतील असे शरद पवार यांनी सांगितले. याचबरोबर शिवसेनेचे करमाळ्यचे माजी आमदार नारायण आबा पाटील येत्या 26 एप्रिल रोजी पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar : रशियाचा पुतीन अन् भारताचे मोदी यांच्यात फरक नाही; शरद पवारांचा थेट हल्लाबोल
पुतीन अन् मोदी यांच्यात फरक नाही
‘भाजपनं जाहीरनाम्यात जी काही आश्वासनं दिली आहेत त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही. कारण अनेक प्रश्नांवर आश्वासनं देणं आणि त्याची अंमलबजावणी न करणं हे भाजपचं वैशिष्ट्य आहे. ‘ईडी’, ‘सीबीआय’ या यंत्रणांचा गैरवापर करणं हे मोदींचं सूत्र आहे. मोदी लोकशाही उद्धवस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत. एकही विरोधक निवडून येऊ देऊ नका असं ते म्हणतात. लोकशाहीत सत्ताधारी पक्ष जसा तसाच विरोधी पक्षही महत्वाचा असतो. एकही माणूस निवडून येऊ देऊ नका ही भूमिका घेणं याचा अर्थ रशियाचा पुतीन आणि भारताचा नरेंद्र यात काही फरक नाही या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आहोत’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली.