सांगली काँग्रेसनं का सोडली? पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, तीन पक्षांच्या आघाडीत…
Prithviraj Chavan : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सांगलीत जमा झाले आहेत. या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सन 2019 मध्ये आपल्याला नाईलाजाने आघाडी करावी लागली असे वक्तव्य केलं. या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, युती किंवा आघाडी करून निवडणूक लढवत असताना मित्र पक्षांमध्ये संघर्ष होत असतो यात काही नवीन नाही. पण सांगलीच्या जागेवरून जो संघर्ष झाला तो अभूतपूर्व असाच होता. 2019 मध्ये सुद्धा आपल्यासमोर नाईलाज होता म्हणून आघाडी करावी लागली. या निवडणुकांचा निकाल वेगळा लागला असता तर कशाला आघाडी करावी लागली असती, असा सवाल त्यांनी केला. परंतु आता या गोष्टी विसरून आपल्याला महविकास आघाडीला विजयी करायचे आहे.
Sangli News : खरा पिक्चर चार दिवसांनी सुरू होईल, मैदान सोडून पळू नकोस; विशाल पाटलांना थेट आव्हान
सांगली मतदारसंघात काँग्रेसची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळायला हवी होती. या जागेवर उमेदवार ठरवताना काहीच वेळ लागणार नाही असे वाटत होते. परंतु ही जागा काँग्रेसच्या हातातून गेली. याआधी सुद्धा असेच घडले होते. परंतु, यावेळी असे काही होणार नाही अशी खात्री होती. तीन पक्षांच्या आघाडीत काही प्रश्न निर्माण झाले आणि ही जागा पुन्हा आपल्या हातातून निसटली, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसची जागा काँग्रेसला मिळावी हा आग्रह होता : कदम
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, पूर्वी आमच्यात गटबाजी होती, पण यावेळी आम्ही गटबाजीला पूर्णविराम दिला. काँग्रेस हा एकच पक्ष, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा एकच गट आम्ही तयार केला होता. विशाल पाटील यांच्या रुपाने जिल्हा काँग्रेस कमिटीकडून एकच नाव, राज्य काँग्रेस कमिटीकडून एकच नाव दिल्लीला गेले. विशाल पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी असे त्यांना सांगितले होते. जिल्ह्यात 200 किलोमीटर आम्ही जनसंवाद पदयात्रा काढली. यंदा काँगेसची जागा ही काँग्रेसला मिळाली पाहिजे हा आग्रह होता. पण कोणाची तरी दृष्ट लागली. ती दृष्ट काढण्याची ताकद आमच्यात आहे, असा इशाराही अप्रत्यक्षपणे त्यांनी दिला.
Sangli Lok Sabha : “मी माघार घ्यायला तयार पण..” विशाल पाटलांच्या गुगलीने ‘मविआ’ कोंडीत