“होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” भाजप खासदार अन् सख्ख्या मित्राचा दावा

“होकायंत्राने इशारा दिलाय, लवकरच जयंत पाटील आपल्यात;” भाजप खासदार अन् सख्ख्या मित्राचा दावा

सांगली : मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आहेत. पाटील यांनी मात्र वेळोवेळी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. अशात आता सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनी जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा करत या चर्चांना पुन्हा एकदा हवा दिली आहे. ते मिरज येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कामगारमंत्री सुरेश खाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील आणि भाजपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. (NCP MLA Jayant Patil will join bjp soon said bjp MP Sanjay Patil in Miraj)

काय म्हणाले संजयकाका पाटील?

या कार्यक्रमात बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, “15 दिवसांपूर्वी सुरेशबापू आवटींनी जयंत पाटलांचा एक कार्यक्रम घेतला. त्यानंतर ते भाजपमध्ये येतात, राष्ट्रवादीत राहतात का अजितदादांच्या गटात जातात, ते बघू. पण निशिकांतदादा, या होकायंत्राने इशारा दिलाय. त्यामुळे लवकरच त्यांचा आपल्यात प्रवेश होईल अशी आशा आहे. या होकायंत्राप्रमाणे आपण आपली दिशा ठरवू. मी सुरेशबापू आवटींना मी फार ओळखतो. राजकारणातील होकायंत्र काय असतं ते त्यांच्याकडे बघितल्यावर कळत”, असंही ते म्हणाले.

Sharad Pawar : शरद पवारांचा फोटो वापरू नका; अजितदादा गटाची कार्यकर्त्यांना तंबी

जयंत पाटील आणि संजय पाटील यांचे सख्य :

जयंत पाटील आणि संजय पाटील यांचे सख्य सांगली जिल्ह्याला परिचीत आहे. सांगली जिल्ह्यात पूर्वीपासून राष्ट्रवादीत जयंत पाटील आणि दुसरा आर. आर. पाटील असे दोन गट पाहायला मिळतात. आता आर. आर. पाटील यांचे निधन झाले असले तरीही ही जिल्ह्यात जयंत पाटील यांचे आर. आर. पाटील यांच्या गटाशी फारशी सख्य नाही.

दुसऱ्या बाजूला संजय पाटील यांचा प्रवास आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी आणि आता भाजप असा राहिला आहे. पण काँग्रेसमध्ये असल्यापासूनच जयंत पाटील यांच्या गटातील आणि आर. आर. पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे. 1999 साली आर. आर. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर संजय पाटील काँग्रेसमध्ये राहिले. त्यांनी त्यावर्षी आर. आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूकही लढवली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला.

पुढे 2004 सालीही त्यांनी अपक्ष म्हणून आर. आर. पाटील यांना आव्हान दिले. मात्र पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी विधान परिषदेवर संधी देत संजय पाटील आणि आर. आर. पाटील यांच्यातील विरोध मिटविण्याचा प्रयत्न झाला. 2014 साली संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करत दोनवेळा लोकसभा गाठली.

‘पवारांनी संधी दिली’ म्हणणाऱ्यांना हसन मुश्रीफांच खोचक प्रत्युत्तर, म्हणाले, ‘विरोध..,’

मात्र जयंत पाटील आणि संजय पाटील यांच्यातील सख्य कायम राहिले. अलीकडे एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आग्रहाने संजय पाटील यांना आपल्या जवळ बसवून घेतले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये जयंत पाटील मंत्री असताना एकदा त्यांच्या स्वागतासाठी संजय पाटील कराड विमानतळावर आले होते. त्यानंतर दोघांनी एकाच गाडीतून प्रवास करत विश्रामगृहावर काही वेळ चर्चाही केली होती.

दरम्यान, आता याच संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्याविषयीच्या वर्तविलेल्या भविष्यवाणीची जिल्ह्यात एकच चर्चा सुरु आहे.

सुरेश आवटी कोण आहेत?

सुरेश आवटी हे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी सभापती आहेत. ते सध्या भाजपमध्ये असून यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा प्रवास राहिला आहे. सुरेश आवटी यांचे निरंजन आणि संदीप आवटी ही दोन्ही मुले सध्या नगरसेवक आहेत. यातील निरंजन आवटी यांच्या संकल्पनेतून मिरज शहरातील महात्मा गांधी चौकात १०० फुटी राष्ट्रीय ध्वज आणि मिरज शहराची ओळख असलेल्या संगीत क्षेत्रातील तंतुवाद्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या प्रतिकृती अनावरण सोहळा 15 ऑगस्टला संपन्न झाला. याच कार्यक्रमाला जयंत पाटील आणि सुरेश खाडे हे दोघेही उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube