रोहित पाटलांना प्रभाकर पाटलांचे आव्हान; तासगावात भिडणार दोन तगडे तरुण…

रोहित पाटलांना प्रभाकर पाटलांचे आव्हान; तासगावात भिडणार दोन तगडे तरुण…

“आर. आर. पाटील यांची कमतरता भरुन काढण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. म्हणून भविष्यातील विधानसभेच्या निवडणुकीत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून रोहित पाटील यांना साथ द्या”, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिला उमेदवार जाहीर केला आहे. रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त तासगावमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पवारांनी ही घोषणा केली. खरंतर यंदा रोहित पाटील हेच उमेदवार असतील हे फिक्सच होते. गतवेळी त्यांना 25 वर्षे पूर्ण नसल्याने सुमनताईंना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे रोहित यांच्या उमेदवारीच्या घोषणेचे जास्त आश्चर्य वाटत नाहीये. उत्सुकता आहे ती रोहित पाटील यांना समोरुन आव्हान कोणाचे असणार. (Prabhakar Patil can challenge Rohit Patil from BJP or ncp)

आतापर्यंत दिनकर आबा पाटील, अजित घोरपडे यांचे आव्हान आर. आर. पाटील असतील किंवा सुमन पाटील असतील यांनी लिलया पेलले. आर. आर. पाटील सहावेळा आमदार झाले, सुमनताई दोनवेळा आमदार झाल्या. पण लोकसभा निवडणुकीपासून समीकरणे बदलली आहेत. या समीकरणात प्रभाकर पाटील (Prabhakar Patil) या दुसऱ्या तरुण नेत्याचे नाव समोर येत आहे. प्रभाकर पाटील हे भाजपमधून किंवा वेळ पडली तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही रोहित पाटील यांना आव्हान देऊ शकतात, त्यांना जड जाऊ शकतात असे बोलले जात आहे. नेमके कोण आहेत हे प्रभाकर पाटील आणि ते रोहित पाटलांना कसं आव्हान ठरु शकतात का? तेच आपण समजून घेऊ.

वडेट्टीवारांची काम थांबवण्याची मागणी; महाजनांकडून उद्धव ठाकरेंचा उल्लेख, सभागृहात जोरदार घमासान

स्वर्गीय दिनकर आबा पाटील यांचे वर्चस्व मोडित काढत आर. आर. पाटील यांनी तासगाव मतदारसंघावर आपली मांड पक्की केली. त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना संजय पाटील यांचेही आव्हान मिळाले. 2014 मध्ये आर. आर. आबांना कवठे-महांकाळच्या अजितराव घोरपडे यांनी घाम फोडला. आधीच भाजपची लाट, त्या लाटेत अगदी कट्टर विरोधक असलेले संजयकाका पाटील खासदार झाले होते. त्यांच्या जोडीला अजितराव घोरपडे आले होते. त्यांनीही भाजपमधूनच निवडणूक लढवली. त्यामुळे आबांची जागा धोक्यात आहे, असे बोलले गेले. पण आबा तरले. 22 हजार मतांनी विजयी झाले. आमचाच आमदार आणि आमचाच खासदार असे तासगावकरांनी तालुक्याचे राजकारण सेट केले.

राजकारण सेट असतानाच आबांचे निधन झाले. त्यांच्या निधानंतर राष्ट्रवादीने सुमनताई पाटलांना तिकीट दिले. पोटनिवडणुकीत त्या निवडूनही आल्या. 2019 मध्ये घोरपडेंनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला. तशी ती निवडणूक सुमनताईंसाठी सोपी नव्हती. ऐनवेळी मतदारसंघ सेनेच्या वाट्याला गेला होता. संजयकाका पाटील यांनीही ताकद सेनेच्या बाजूने उभी केली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपची ताकद घोरपडेंच्या पाठीशी होती. पण 20-21 वर्षांच्या रोहित पाटलांनी कसलेल्या राजकारण्याला लाजवणारे नियोजन राबवले. सुमनताई तब्बल 61 हजार मतांनी विजयी झाल्या. तिथेच युवा रोहित यांच्या राजकीय एन्ट्रीची बीजे रोवली गेली. त्यांचे काम बघून जयंत पाटील यांनीही त्याचवेळी पुढचे उमेदवार रोहित पाटील असतील असे जाहीर करुन टाकले होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून घोरपडे यांनी आपली दिशा बदलली. यामागे संजयकाका पाटील आणि घोरपडे यांचे बिघडलेले संबंध हे कारण होतेच. पण दुसरे मोठे कारण होते प्रभाकर पाटील यांचे राजकीय लाँचिन्ग. संजय काका पाटील खासदार होते. जोडीला त्यांनी त्यांचा मुलगा प्रभाकर पाटील यांचेही विधानसभेसाठी तयार केले. ते वर्षभरापासून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मशागत करत होते. हीच गोष्ट घोरपडेंना खटकली. त्यांनी लोकसभेला विशाल पाटील यांच्यामागे ताकद उभी केली. कवठेमहांकाळ तालुका आणि मिरज पूर्वचा भाग त्यांनी पिंजून काढला. कार्यकर्त्यांचा कल पाहून सुमनताई पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या भूमिकेला बासनात गुंडाळले. घोरपडेंच्या सुरात सूर मिसळून विशाल पाटलांसाठी मोर्चेबांधणी केली.

रोहित पवारांचा मोठा आरोप; तीन हजार कोटींची संपत्ती असल्याने सरकार ‘त्या’ अधिकाऱ्याला वाचवतय

आता विशाल पाटील खासदार आहेत. घोरपडे यांनी गतवेळीच आपली शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले होते. ते सध्या जयंत पाटील यांच्याच मदतीने जिल्हा बँकेवर आहेत. त्यामुळे ते रोहित पाटील यांच्यामागे उभे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपमधून आमदारकीसाठी प्रभाकर पाटील प्रयत्नशील आहेत. संजयकाका पाटलांचा पराभव झाल्याने, घोरपडेंनी साथ सोडल्याने भाजपला तासगाव आणि कवठे महांकाळ या दोन्ही तालुक्यांवर वर्चस्व ठेवण्यासाठी इथे प्रभाकर पाटील यांच्यारुपाने चांगला पर्याय ठरु शकतो. भाजप, संजयकाका पाटील यांची ताकद अशा दोन्ही समीकरणांच्या आधारे ते रोहित पाटील यांना जड जाऊ शकतात, असे सध्याचे तरी चित्र दिसते. पण महायुतीत हा मतदारसंघ अजितदादांच्या वाट्याला गेल्यास प्रभाकर पाटील राष्ट्रवादीकडूनही उभे राहु शकतात, असे सांगितले जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज