Maratha Federation : राजेंद्र कोंढरेंच्या निवडीवर मराठा महासंघाचा आक्षेप

  • Written By: Published:
Maratha Federation : राजेंद्र कोंढरेंच्या निवडीवर मराठा महासंघाचा आक्षेप

मुंबई : अखिल भारतीय मराठा महासंघाची कार्यकारिणी अस्तित्वात असताना तेव्हाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी कार्यकारणीतील इतर सदस्यांना विश्वासात न घेता व कोणाचीही संमती न घेता २९ जानेवारी २०२३ रोजी बोलावलेली विशेष सर्वसाधारण सभा घटनाबाह्य व अनधिकृत आहे. तसेच यातील निर्णय बेकायदेशीर असल्याने ते अखिल भारतीय मराठा महासंघावर बंधनकारक नाहीत असे स्पष्टीकरण महासंघाने दिले आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस दिलीपदादा जगताप यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मुळात संस्थेचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे असताना कोंढरे यांनी पुणे येथे बेकायदेशीरपणे तीन नोव्हेंबर २०२१ रोजी घटनाबाह्य सभा बोलावली होती व कोणतेही अधिकार नसताना अध्यक्षांचे अधिकार गोठवल्याचे घोषित केले व स्वतःला अध्यक्ष म्हणूनही जाहीर केले.

त्यानंतर महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी त्यांच्या विशेष अधिकारांचा वापर करून चार नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईतील सभेत कोंढरे यांना बेकायदेशीर कृत्य केल्यामुळे पदममुक्त केले. आता कोंढरे हे संस्थेचे पदाधिकारी नाहीत व त्यांना अखिल भारतीय मराठा महासंघ या संस्थेच्या नावाने कोणताही निधी जमा करण्याचा अधिकार नाही. तरीही त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष असल्याचे भासवून २९ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे सर्वसाधारण सभा आयोजित केली. तरी कोंढरे यांची ही कथित सर्वसाधारण सभा अनधिकृत असून त्यातील सर्व निर्णय बेकायदा असल्याने ते अखिल भारतीय मराठा महासंघावर बंधनकारक नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जगताप यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube