पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होणार तेव्हाच षडयंत्र; पवनराजेंच्या हत्या प्रकरण निकालानंतर राणा पाटील यांनी सगळच सांगितलं
पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांची दुर्दैवी हत्या झाली त्याला आता जवळजवळ वीस वर्षे होत आली आहेत.
दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित (Nimbalkar) पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज विशेष न्यायालयाने अंतिम निकाल दिला आहे. खटल्याचा संपूर्ण पाया ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा होता, त्याची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत ठरल्याचं स्पष्ट करत न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पवनराजे निंबाळकर आणि समद काझी यांची दुर्दैवी हत्या झाली त्याला आता जवळजवळ वीस वर्षे होत आली आहेत. गेली सतरा वर्षे या विषयाच्या बाबतीत जो प्रक्रियेचा विषय आहे तो सुरू आहे. न्यायादेवतेवर पहिल्यापासून आमचा विश्वास होता. 17 वर्षानंतर न्यायादेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे. परंतु सतरा वर्षे या लोकांची कोण परत करणार? पद्मसिंह पाटील यांना 17 वर्षे हे सहन करावे लागले. त्यांचा या विषयाशी कुठलाही संबंध नसताना राजकीय षडयंत्राने हे केलं गेलं. टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी पुढे येतील, परंतु आज निश्चितपणे आम्हाला मोठं समाधान आहे की न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला, असं राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
राणाजगजितसिंह पाटील पुढे म्हणाले की, दुर्दैवाने पद्मसिंह पाटील यांना कोर्टात नेमकं काय झालं, याबाबत मी सांगू शकणार नाही आणि त्यांना ते समजणार देखील नाही. पण ही परिस्थिती कशामुळं उद्भवली, हे षड्यंत्र कोणी, कशामुळे केले, यात कोण कोण प्यादे होते? पद्मसिंह पाटील हे 1990 च्या दरम्यान मुख्यमंत्री होणार होते, असा त्यांना शब्द दिला होता. काही कारणाने ते होऊ शकले नाही. 2009 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले होते, या काळात कॅबिनेटचा विस्तार होणार होता, बरोबर तेव्हाच काही लोकांनी याबाबतीत एका वेगळ्या पद्धतीने पुढाकार घेतला, षडयंत्र रचलं गेलं. ते आज कोर्टाच्या माध्यमातून आमच्या देखील लक्षात आलेलं आहे असंही ते म्हणाले.
पवनराजे हत्याकांड प्रकरण : पुराव्यांअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता
आता प्रत्यक्षात कोर्टाची ऑर्डर उपलब्ध झाल्यानंतर, त्याचं वाचन केल्यानंतर मी याबाबत सविस्तर बोलू शकेल. पण न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला . इतके दिवस आम्ही कोणी काहीच बोललो नाही, कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. बरेच जण याचा राजकीय फायदा घेत होते, अतिशय खोटी विधानं करत होते. परंतु मी तेव्हा काहीच बोललो नाही, योग्य वेळेस गरजेनुसार मी बोलेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली असून, अमित शाह यांनी सीबीआयला वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत विचारले असता राणाजगजितसिंह पाटील म्हणाले की, न्यायादेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. कुठंही न्यायालयीन प्रक्रिया असेल, तिथं आमची बाजू आम्ही ठामपणे मांडू आणि आम्हाला निश्चितपणे न्याय मिळेल. या खटल्याला 17 वर्षे का लागले, नेमकं कोणी यात वेळकाढूपणा केला, हे आज ना उद्या मी निश्चित सांगेल, असंही त्यांनी म्हटलं.
सर्व आरोपींची निर्दोष सुटका झाली, मग पवनराजे निंबाळकर यांची हत्या कोणी केली? असा सवाल ओमराजे समर्थकांकडून विचारला जात आहे, यावर बोलताना राणाजगजितसिंह पाटील यांनी स्पष्ट केलं की, ‘आमची मागणी निश्चितपणे राहणार आहे की, नेमकी हत्या कोणी केली? त्यात काय कारणं होती? अनेक गोष्टी आहेत ज्या मला आज बोलायच्या नाहीत. तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्याचा योग्य तपास झाला तर या विषयातले खरे आरोपी कोण आहेत, ते आजही निदर्शनास येऊ शकते, असा माझा ठाम विश्वास आहे. या दुर्दैवी घटनेनंतर दुसऱ्याच महिन्यात या घटनेचा वापर राजकारणासाठी केला गेला, असंही त्यांनी म्हटलं आहे.