…आम्हाला कधी न्याय मिळणार?, संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी
Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग येथे संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत सभागृहात निवेदन दिलं. यावेळी त्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान आम्हाला न्याय हवा आहे अशी आर्त मागणी संतोष देशमुख यांच्या पत्नीने केली आहे.
पत्नीने काय म्हटलं आहे?
आज १३ दिवस झाले, संतोष देशमुख यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर एका तासात या सगळ्या गोष्टी घडू शकतात तरीही इतका वेळ का लागतो आहे? असा प्रश्न संतोष देशमुख यांच्या पत्नीने विचारला आहे.
बहिणीने काय म्हटलं आहे?
संतोष यांच्या खूप आठवणी आहेत. मी काय काय आठवणी सांगू. माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा. माझ्या भावाला जसं ठार केलं गेलं तशीच शिक्षा आरोपींना द्या अशी मागणी संतोष देशमुख यांच्या बहिणीने केली आहे. त्यांच्या मुलीनेही हीच मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीने आणि बहिणीने काही वेळापूर्वीच माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ही मागणी केली आहे.
मुलगी वैभवी काय म्हणाली?
सरकारने आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. माझे वडील खूप चांगले होते, देवमाणूस होते. त्यांची अशाप्रकारे हत्या करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात ही दहशत आहे की चांगल्या माणसाबरोबर असं झालं तर मग आपलं काय होईल? त्यामुळे गुन्हेगारांना लवकर अटक झाली पाहिजे. मी डॉक्टर व्हावं किंवा चांगलं काहीतरी मोठ्या पदावर जावं असंच माझ्या वडिलांना वाटत होतं आणि मी त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण करणार असं वैभवीने म्हटलं आहे.
कठोर शिक्षा आरोपींना द्या
वैभवी पुढे म्हणाली, “मला वडिलांचं जे स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यासाठी मला सरकारने सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी अपेक्षा आहे. आत्ता पोलिसांकडून जो तपास सुरु आहे त्यावर आम्ही समाधानी नाही. या घटनेत एकूण सात आरोपी आहेत असं सांगितलं जातं आहे. त्यातल्या चौघांनाच अटक झाली आहे. बाकी तीन आरोपींना तातडीने अटक झाली पाहिजे. तसंच या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला अटक झाली पाहिजे. आज माझी ही मागणी आहे की माझ्या वडिलांना जसं ठार मारण्यात आलं तशीच शिक्षा आरोपींना झाली पाहिजे असंही वैभवी देशमुखने म्हटलं आहे.