उद्धव ठाकरे आमदार राहणार की खासदार होणार? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

ठाकरे कुटुंबातून पहिला खासदार राज्यसभेत जाणार का, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 121

Will Uddhav Thackeray remain an MLA or become an MP? : राज्यसभेच्या एका जागेसाठी महाविकास आघाडीत सध्या जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना उबाठा यांनी या जागेवर उघडपणे दावा केला असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नाव पुढे केले जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात रंगल्या होत्या. ठाकरे कुटुंबातून पहिला खासदार राज्यसभेत जाणार का, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या चर्चांना संजय राऊत यांनी पूर्णविराम दिला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी स्पष्ट केले की, उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेसाठी कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. “त्यांनी पुन्हा विधिमंडळात जावं आणि आमदारांना मार्गदर्शन करावं, ही आमची इच्छा आहे,” असे ते म्हणाले. या वक्तव्यानंतर ठाकरे राज्यसभेची निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ते राज्याच्या राजकारणात सक्रिय राहणार असून, विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ जून 2026 मध्ये संपत असून, त्यानंतर ते पुन्हा निवडणूक लढवू शकतात, असे संकेत मिळत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी तिन्ही पक्ष आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे 10, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कडे 20 आणि काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. अशा प्रकारे महाविकास आघाडीचे एकूण 46 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यसभेची जागा जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 37 मते आवश्यक आहेत.

प्लास्टिक बंदी अधिक कठोर; उल्लंघन करणाऱ्यांना तुरुंगवास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

ठाकरे गटातून राज्यसभेसाठी अनेक इच्छुक पुढे आले आहेत. विद्यमान खासदार प्रियांका चतुर्वेदी पुन्हा उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर राजन विचारे यांनीही राज्यसभेसाठी फिल्डिंग लावली आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ संपत आल्याने अंबादास दानवे यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. कोकणातील वर्चस्व टिकवण्यासाठी विनायक राऊत हेही इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचेही नाव चर्चेत आहे.

राज्यसभेच्या या एका जागेबाबत अंतिम निर्णय महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित चर्चेनंतर घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही काँग्रेसचा दावा कायम असल्याचे सांगितले. काँग्रेसमधील चार ते पाच नेते राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, शरद पवार यांनीही या जागेवर कोणाला पाठवायचे, याचा निर्णय महाविकास आघाडीने सामूहिकरित्या घ्यावा, असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे राज्यसभेची ही एकमेव जागा अखेर कोणाच्या वाट्याला जाणार, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीतील चर्चेनंतरच या राजकीय पेचप्रसंगाचा उलगडा होणार आहे.

follow us