कल्याणामध्ये धक्कादायक प्रकार, इडलीमध्ये सापडली अळी; दुकानातील सामान जप्त

Kalyan : कल्याणमध्ये स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खाण्यासाठी घेतलेल्या इडलीमध्ये (idli) अळी निघाल्याने एक ग्राहक अक्षरशः संतापला. तक्रार केल्यावर दुकानदाराने माफी मागण्याऐवजी धमकी दिली. त्यानंतर पालिकेने दुकानातील सामान जप्त केले तर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण (प.) परिसरातील कर्णिक रोड येथे घडलेली ही घटना धक्कादायक आहे. तक्रारदार प्रथमेश गोरख शिंदे यांनी 12 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास दुकानातून एक वडा सांबर प्लेट आणि एक इडली प्लेट खरेदी केली. ते पार्सल घरी नेऊन कुटुंबातील सदस्यांना दिलं असता, तक्रारदारांनी स्वतः खाण्यास घेतलेल्या इडलीमध्ये जिवंत अळी असल्याचे दिसले. ही घटना पाहून तक्रारदार थेट दुकानदार लिंगराज लिगे गौडा यांच्याकडे गेला आणि त्यांनी याबाबत सूचना दिली. मात्र, दुकानदारांनी ती इडली फेकून अरेरावीची भाषा केली.
यानंतर तक्रारदाराने महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असल्याची तक्रार केली. त्यानुसार पालिकेने देखील या दुकानावर कारवाई करत दुकानातील सर्व खाद्यसाहित्य जप्त केले. यानंतर संतापलेल्या दुकानदाराने चक्क तक्रारदाराला “तुला बघून घेतो” अशी धमकी दिली. दुकानदाराच्या या भीतीमुळे तक्रारदारांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
कबुतरखाना विषय वादाचा नाही, समाजाचा आहे; मु्ख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट
सध्या कल्याण महात्मा फुले पोलिसांनी दुकानदार लिंगराज लिगे गौडा विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी अशा घटना गंभीरपणे घेऊन अन्न सुरक्षा विभागाने अधिक कडक तपासणी करण्याची मागणी केली आहे.